मुंबई : एरव्ही वाहनांची वर्दळ, विक्रेते आणि ग्राहकांनी गजबजाटात हरवणाऱ्या झवेरी बाजारातील रस्त्यांना सध्या उत्सवाचे रूप आले आहे. झवेरी बाजारातील रस्ता केवळ पादचाऱ्यांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. झवेरी बाजाराला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सध्या रत्न आणि दागिने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने ठिकठिकाणी उभारलेल्या कमानी आणि दिव्यांची रोषणाईने परिसर उजळला आहे. तसेच दिवाळीनिमित्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘रेड कार्पेट’च्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत. यामुळे सध्या झवेरी बाजारात उत्सवाचे वातावरण दिसून येत आहे.
झवेरी बाजार हा मुंबईतीलसोने चांदी आणि दागिन्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. झवेरी बाजार भारतातील मोठ्या सराफ बाजारांपैकी एक मानला जातो. यंदा प्रथमच दागिने महोत्सवाच्या निमित्ताने झवेरी बाजारातून मुंबादेवीकडे जाणारा मार्ग फक्त पादचाऱ्यांसाठी खुला केला आहे. यामुळे नेहमीच्या गजबजलेल्या रस्त्यावर नागरिकांना खरेदीसाठी निवांतपणे फिरता येत आहे.
ठिकठिकाणी केलेल्या रोषणाईमुळे हा रस्ता उजळून निघाला असून कमानी आणि फुलांनी केलेल्या सजावटीमुळे हा रस्ता आकर्षक दिसत आहे. यामुळे ग्राहकांसह पर्यटकही या महोत्सवानिमित्त रिसरात फिरण्याचा आनंद घेता येत आहे. यामुळे या परिसरात सध्या उत्साहाचे वातावरण असून यामुळे व्यापारी, दुकानदार यांच्यामध्येही आनंदाचे वातावरण आहे. मुंबादेवी परिसरातील स्वयंसेवक गर्दीचे व्यवस्थापन आणि परिसर स्वच्छ राहावा यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. यामुळे नेहमी फेरीवाले आणि वाहनांची वर्दळीत हरवणाऱ्या या परिसराला एका विशेष बाजाराचे रूप आले आहे.
बॅटरी कार सेवा आणि सेल्फी पॉईंट
सजावट आणि रोषणाई सोबतच चालण्यास त्रास होत असलेल्या ग्राहकांसाठी खास बॅटरी कार सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच ठिकठिकाणी सेल्फी पॉईंट्स उभारण्यात आले असून यानिमित्ताने ग्राहक खरेदीसोबतच फोटो आणि रीलचाही आनंद घेताना दिसत आहेत. यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहक मोठ्या संख्येने झवेरी बाजारात खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले.
झवेरी बाजाराचा यंदा ‘अमृतमहोत्सव’
मुंबईतील या ऐतिहासिक झवेरी बाजाराचे यंदा ‘अमृतमहोत्सवी वर्ष’ आहे. यामुळे सध्या व्यापारी, दुकानदार आणि स्थानिक नागरिक एकत्र येत या महोत्सवाद्वारे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आनंद साजरा करताना दिसत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी झवेरी बाजार आकर्षक सजावट आणि रोषणाईमुळे अधिकच उजळून निघत आहे. यामुळे झवेरी बाजार परिसर सध्या ग्राहकांच्या आकर्षणाचा विषय बनला आहे.