मुंबई : ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेवरील मेट्रो गाडी सकाळी पावणे नऊच्या सुमारास डी. एन. नगर मेट्रो स्थानकावर आली, मात्र ती रिकामी करून कारशेडला पाठविण्याची नामुष्की मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडवर (एमएमओपीएल) आली. वर्सोव्यावरून निघालेली मेट्रो गाडी निर्धारित वेग पकडत नसल्याने ती डी. एन. नगरला रिकामी करून दुरुस्तीसाठी कारशेडला पाठविण्यात आली. मात्र ऐन गर्दीच्या वेळी या मेट्रो गाडीची फेरी अचानक रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सर्वच मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.
मेट्रो १ वरुन दिवसाला पाच लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे मेट्रो १ मार्गिकेवरील सर्वच स्थानकांवर नेहमीच गर्दी असते. त्यातही सकाळी कार्यालयीन वेळेत प्रचंड गर्दी असते. असे असताना सोमवारी मेट्रो १ मार्गिकेवरील एक फेरी सकाळी पाऊणे नऊच्या सुमारास अचानक रद्द करण्यात आली. त्यामुळे मेट्रो स्थानकांवरील गर्दीत प्रचंड वाढ झाली.
एमएमओपीएलने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेआठच्या सुमारास वर्सोव्यावरून घाटकोपरच्या दिशेने निघालेली मेट्रो गाडी निर्धारित वेग घेत नव्हती. काही तांत्रिक कारणामुळे गाडी वेगाने धावत नसल्याचे निदर्शनास आल्याने पावणे नऊच्या सुमारास ती डी. एन. नगर मेट्रो स्थानकात येताच पुढे न नेण्याचा निर्णय एमएमओपीएलने घेतला. त्यानुसार डी. एन. नगर मेट्रो स्थानकात प्रवाशांना खाली उतरवून मेट्रो गाडी कारशेडला नेण्यात आली. गाडीची आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येत आहे. मात्र या गाडीची डी. एन. नगर – घाटकोपर दरम्यानची फेरी रद्द झाल्याने मेट्रो १ चे पुढील वेळापत्रकही काही मिनिटांसाठी विस्कळीत झाले. परिणामी मेट्रो स्थानकांमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. काही वेळाने मेट्रो १ सेवा पूर्ववत झाली. मात्र ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. अनेक प्रवाशांनी एक्स माध्यमांवर चित्रफीत टाकून आपला राग व्यक्त केला.