मुंबई : पूर्व दृतगती मार्गावरील घाटकोपर ते विक्रोळी आणि पश्चिम दृतगती मार्गावरील अंधेरी ते कांदिवली या भागात मुंबई महानगर पालिकेतर्फे आज रात्री स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. तर शनिवारी रात्री विक्रोळी ते मुलुंड चेक नाका आणि कांदिवली ते दहिसर चेक नाका या भागाची स्वच्छता केली जाणार आहे.

स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई’ या उपक्रमांतर्गत मुंबई महानगरपालिकेने विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविली आहे. मुंबईतील शासकीय व खासगी रुग्णालयांच्या स्वच्छतेची मोहीम राबविल्यानंतर आता पूर्व आणि पश्चिम महामार्गाच्या स्वच्छतेसाठी १७ मार्चपासून विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर हाती घेण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेत आतापर्यंत तीन रात्रींत तब्बल ४१.२ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. रोज रात्री १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत राबविल्या जात असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत ११८.५ टन राडारोडा संकलित करुन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

या मोहिमेत दोन्ही महामार्गालगतचे सेवा रस्ते, उतार (रॅम्प) आदी परिसर स्वच्छ करण्यात येत आहेत. महामार्गावरील दिशादर्शक फलक, झाडांच्या बुंध्यांची व कुंपणांची स्वच्छता व रंगरंगोटी, बस थांब्यावरील आसन व्यवस्था नीट करणे, अडगळीतील वस्तू आणि कचरा हटवणे, रस्त्यावर अडथळा ठरणारी जुनी वाहने तसेच अनधिकृत जाहिरात फलकांचे निष्कासन, पदपथांचे पेव्हर ब्लॉक व दुभाजकांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करणे आदी बाबींचा समावेश आहे.

स्वच्छता मोहिमेंतर्गत दररोज रात्री १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता या कालावधीत विशेष स्वच्छता करण्यात येते. यात दोन्ही महामार्ग मिळून आतापर्यंत एकूण ४१.२ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये ११८.५ टन राडारोडा, २२.२ टन कचरा आणि १४.५ टन अन्य टाकाऊ वस्तू संकलित करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. मेकॅनिकल पॉवर स्वीपर्स, लिटर पिकर्स, मिस्टिंग मशीन, डंपर आणि वॉटर टँकर्स अशा एकूण १६ यांत्रिक स्वच्छता संयंत्रांचा या मोहिमेत समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहिमेच्या पुढील टप्प्यात २१ आणि २२ मार्च रोजी पूर्व महामार्गावरील क्रमश: घाटकोपर ते विक्रोळी, विक्रोळी ते मुलुंड चेक नाका तसेच पश्चिम महामार्गावरील क्रमश: अंधेरी ते कांदिवली ९० फूट मार्ग, कांदिवली ९० फूट मार्ग ते दहिसर चेक नाका येथील स्वच्छता करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.