मध्य रेल्वेवर प्रायोगिक तत्त्वावर प्रणाली सुरू

आठवडाभरात मध्य रेल्वेचा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित
भरपूर पाऊस पडतोय.. कामावर जायला निघालात.. पण लोकल गाडय़ांची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी टीव्हीच्या पडद्यावरच अवलंबून राहावे लागत आहे? आता ही परिस्थिती बदलण्यासाठी मध्य रेल्वेने नवीन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रणालीनुसार लोकल गाडय़ांची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी प्रवाशांना मध्य रेल्वेच्या टोल फ्री क्रमांकावर एक मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर प्रवाशांना त्वरित एक संदेश प्राप्त होणार असून त्या संदेशात उपनगरीय रेल्वेची सद्य:स्थिती देण्यात येईल.
कामावर जाण्यासाठी घाईघाईत स्थानकात प्रवेश केल्यानंतर गाडय़ा दिरंगाईने धावत असल्याची उद्घोषणा कानी पडते आणि वेळेचे सर्व नियोजन कोलमडले, या विचाराने प्रवाशांचा संताप होतो. मध्य रेल्वेवर सततच्या बिघाडांमुळे ही परिस्थिती नेहमीच उद्भवत असल्याने प्रवाशांच्या रोषाला मध्य रेल्वे प्रशासनाला वारंवार सामोरे जावे लागते. बिघाड आहेत, यापेक्षाही त्याबाबतची माहिती वेळेवर मिळत नाही, ही प्रवाशांची तक्रार असते. गाडीत अचानक तांत्रिक बिघाड झाल्यास प्रवाशांचे मोठय़ा प्रमाणात हाल होतात.
प्रवाशांची ही तक्रार दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने नवीन क्लृप्ती शोधली असून एक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे मध्य रेल्वेच्या १८२००२१२४५०१ या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर प्रवाशांच्या मोबाइलवर संदेश मिळणार आहे. या संदेशात उपनगरीय रेल्वेची सध्याची स्थिती काय आहे, रेल्वे किती वेळ उशिराने धावत आहे आदी माहिती दिली असेल. त्यामुळे प्रवासी घरबसल्या लोकलची माहिती जाणून घेऊ शकणार आहेत. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांना विचारले असता त्यांनी ही प्रणाली सध्या काही ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर चालू असल्याचे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रणालीमुळे प्रवाशांना उपनगरीय रेल्वेची अद्ययावत माहिती थेट मोबाइल संदेशाद्वारे मिळणार आहे. पुढील आठवडाभरात ही प्रणाली प्रवाशांच्या सेवेत येणार असून मध्य रेल्वेतर्फे प्रवाशांना ही दिवाळीची अनोखी भेट ठरणार आहे. – नरेंद्र पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे