मुंबई : अंधेरीमधील बहुचर्चित गोपाळकृष्ण गोखले पुलाचे १०० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून येत्या रविवारी संध्याकाळी या पुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर गोखले पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्या येणार आहे. तब्बल अडीच वर्षांनी गोखले पूल पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.
अंधेरी पूर्व – पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या गोपाळकृष्ण गोखले पुलाची दुसरी बाजू लवकरच सुरू होणार आहे. गोखले पूल धोकादायक ठरल्यामुळे नोव्हेंबर २०२२ मध्ये बंद करण्यात आला होता. त्यानंतर या पुलाच्या बांधकामावरून बराच गदारोळ झाला. पुलाची एक बाजू सुरू करण्याची मुदत वारंवार हुकली. गोखले पूल आणि बर्फीवाला पूल यांच्या जोडणीत मोठे अंतर पडले होते. त्यामुळे या पुलाच्या कामाचे हसे झाले होते.
अखेर गोखले पूल आणि बर्फीवाला पुलाची जोडणी करून पुलाची एक बाजू फेब्रुवारी २०२४ मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती. त्यानंतर पुलाच्या दुसऱ्या बाजूचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम आता १०० टक्के पूर्ण झाले असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूल सुरू करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली होती. त्यानुसार पुलाची सगळी कामे पूर्ण झाली असून हा पूल वाहतुकीसाठी कधी खुला होतो याकडे परिसरातील रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
अंधेरी पश्चिमेला गोखले पूल हा बर्फीवाला पुलाला जोडलेला आहे. गोखले पुलाची एक बाजू तयार झाली तेव्हा बर्फीवाला पूल आणि गोखले पुलाच्या जोडणीत अंतर पडले होते. नंतर बर्फीवाला पूल जॅकने उचलून हे दोन पूल जोडण्यात आले होते. आता गोखले पुलाच्या दुसऱ्या बाजूचे काम करतानाच बर्फीवाला पुलाची जोडणीही करण्यात आली. त्यामुळे रविवारपासून हा पूल पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. या पुलाच्या मध्यभागी असलेल्या भिंतीवर रंगरंगोटीही करण्यात येणार आहे.
जेव्हीपीडी अंतर्गत काम वेगाने
जुहू – विलेपार्ले विकास योजना (जेव्हीपीडी) अंतर्गत उड्डाणपुलाच्या पूर्व दिशेकडील पोहोच रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. बर्फीवाला पूल जेथे उतरतो त्या ठिकाणचा बाजूचा रस्ता (स्लीप रोड) अरूंद आहे. त्यामुळे पोहोच रस्ता पूर्ववत करून वाहतुकीसाठी खुला करावा, जेणेकरून नव्याने कार्यान्वित होणाऱ्या बर्फीवाला पुलाच्या दक्षिण भागातील उतारावरील वाहतूक सुरळीत होईल. जुहू जंक्शन गल्लीपासून वाहनांचे आवागमन योग्य प्रकारे होईल, असे निर्देश नुकतेच पालिका अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी यंत्रणेला दिले आहेत.