मुंबई : सोन्याच्या भावाने सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात प्रति १० ग्रॅम २,४३० रुपयांची मोठी उसळी घेत ८८ हजार १०० रुपयांची नवी उच्चांकी पातळी गाठली. जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या भावातील तेजी आणि कमकुवत झालेला रुपया यामुळे ही भाववाढ झाल्याचे ऑल इंडिया सराफा असोसिएशनने स्पष्ट केले. मुंबईतील जव्हेरी बाजारात मात्र २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा घाऊक भाव सोमवारी ८५,६६५ रुपये प्रति १० ग्रॅमवर स्थिरावला होता.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांमुळे जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याच्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत. परिणामी जागतिक पातळीवर सोन्याच्या भावात तेजी निर्माण झाली असून जागतिक धातू वायदा बाजारमंच ‘कॉमेक्स’वर सोन्याचा भाव प्रति औंस ४५ डॉलरने वाढून २,९३२ डॉलरच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला. चांदीचा भाव प्रति औंस एका टक्क्याने वधारून ३२.७६ डॉलरवर गेला. याचा परिणाम देशांतर्गत सराफ बाजारांतही झाला. दिल्लीतील बाजारपेठेत चांदीचा भाव प्रति किलोमागे १ हजार रुपयांनी वाढून ९७ हजार ५०० रुपयांवर गेला. मुंबईच्या घाऊक बाजारातील या मौल्यवान धातूंचे सोमवारचे भाव हे अनुक्रमे ८५ हजार ६६५ रुपये आणि ९५ हजार ५३३ रुपये होते.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातीवर आणखी अतिरिक्त शुल्क आकारण्याची धमकी दिली आहे. यामुळे जागतिक पातळीवर अनिश्चितता निर्माण होऊन गुंतवणूकदारांनी सुरक्षितता म्हणून सोन्याचा आश्रय घेतला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जतीन त्रिवेदी, संशोधन विश्लेषक, एलकेपी सिक्युरिटीज