मुंबई : महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) रविवारी दक्षिण मुंबईतील मशीद बंदर येथे छापा टाकून सुमारे ९ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. तस्करीकरून आणलेले सोने तेथे वितळवण्यात येत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी डीआरआयने सात आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशी नागरिकांच्या मदतीने परदेशातून सोन्याची तस्करी प्रकरणी डीआरआय चौकशी करत होती. त्यावेळी विमानतळावरील काही कर्मचारीही त्यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी परदेशातून तस्करी करून आणलेले सोने आरोपींपर्यंत पोहोचवायचे. त्यानंतर मशीद बंदर येथील युनिटमध्ये ते वितळवून येथील बाजारात छुप्या पद्धतीने विकले जात होते.
या माहितीवर कारवाई करत डीआरआयच्या पथकाने रविवारी मस्जिद बंदर भागातील वितळवणाऱ्या युनिटवर छापा टाकला. यावेळी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत आठ किलो ७४७ ग्रॅम वजनाचे सहा सोन्याचे लगड जप्त करण्यात आले. त्याची किंमत आठ कोटी ९३ लाख रुपये आहे. याप्रकरणी मीनानाथ भुले, विश्वास रामचंद्र यादव ऊर्फ अमोल, उदय दीपक जंगम, रोहित मोहिते आणि विक्रम बालकृष्ण मोटे व राजकुमार पवार अशी अटक आरोपींची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भुले हा विमानतळावरील कर्मचाऱ्यांकडून तस्करीचे सोने घ्यायचा आणि ते वितळवून पुढे ग्राहकांना पोहोचवायचा. यादव हा तस्करीच्या सोन्याच्या सर्व व्यवहारांची नोंद करायचा. जंगम आणि मोहिते हे दोघे वितळवणारे म्हणून काम करत आणि मोटे हा चालक असून तो विमानतळावरून तस्करीचे सोने आणण्याचे काम करत होता. आरोपींकडे जप्त करण्यात आलेल्या सोने खरेदीच्या पावत्या जमा करण्यास सांगण्यात आल्या होत्या पण त्यांनी कोेणतीही अधिकृत कागदपत्र जमा केली नाही. त्यामुळे डीआरआयच्या अधिकाऱ्यांचा संशय बळावला.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, त्यानंतर याप्रकरणी सोने वितवळणाऱ्या युनीटचा मालक राजकुमार पवार आणि चालक रविंद्र साळुंखे यांनाही याप्रकरणात अटक करण्यात आली. डीआरआय आता याप्रकरणात सहभाग इतर आरोपींचा शोध घेत आहे. त्यात कोणत्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे? सोने खरेदी कोणाला विकण्यात यायचे? याबाबत डीआरआय तपास करत आहेत. प्राथमिक तपासात हवाला मार्गाने पैसे पाठवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत डीआरआयचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.