मुंबई : सार्वजनिक – खासगी भागीदारीतून एखाद्या प्रकल्पाची अंमलबजावणी किती प्रभावीपणे करता येऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे बोरिवलीतील महानगरपालिका संचालित ‘कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसेमिया केअर, बालरोग रक्तदोष – कर्करोग व बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्राची (बीएमटी केंद्र) ‘होम अवे फ्रॉम होम’ ही रुग्ण निवासी इमारत होय. मुलांच्या वैद्यकीय उपचारासाठी मुंबईत दाखल होणाऱ्या पालकांसाठी यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे, असे प्रतिपादन मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले. या केंद्रात उपचारांसाठी येणारी मुले आणि त्यांच्या पालकांसाठी निवास, जेवण इत्यादी सर्वंकष व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या ‘होम अवे फ्रॉम होम’ या इमारतीचे लोकार्पण भूषण गगराणी यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.

‘होम अवे फ्रॉम होम’ या रूग्ण निवास इमारतीचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलन करून लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर गगराणी यांनी इमारतीमधील सुविधांची पाहणी केली. मुंबईमध्ये मुलांच्या बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी येणाऱ्या मुलांच्या पालकांसमोर शहरामध्ये निवास, जेवण आणि इतर व्यवस्थेबाबत चिंता असते. मात्र ‘होम अवे फ्रॉम होम’ या निवास इमारतीमुळे या सर्व पालकांची या चिंतेतून सुटका होणार आहे. परिणामी पालकांना आपल्या मुलांच्या उपचारांवर पर्यायाने त्यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करता येईल, असेही गगराणी यांनी नमूद केले.

हेही वाचा…दिवा रत्नागिरीला दादरवरून सुरू न झाल्यास गोरखपूर रेल्वेगाडी रोखू , प्रवाशांचा इशारा

खासगी रूग्णालयांमध्ये बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी सुमारे २५ ते ६० लाख रूपयांदरम्यान खर्च येतो. पण हेच उपचार या केंद्रात नि:शुल्क होतात. असे सांगत केंद्राच्या संकल्पनेपासून वाटचालीपर्यंतची संपूर्ण माहिती देत बीएमटी केंद्राच्या डॉ. ममता मंगलानी यांनी प्रास्ताविक केले. शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. केंद्रातील वरिष्ठ सल्लागार डॉ. रत्ना शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रूग्ण निवास इमारतीमधील सुविधा

‘होम अवे फ्रॉम होम’ ही इमारत उभारण्यासाठी ॲक्सेस लाईफ असिस्टन्स फाऊंडेशन आणि लार्सन अॅण्ड टुब्रो यांनी सर्व सहकार्य केले. या दुमजली इमारतीमध्ये रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना राहण्यासाठी एकूण १८ खोल्या आहेत. त्यामध्ये रुग्णांच्या नातेवाइकांना स्वयंपाकघर, रेफ्रिजरेटर, भांडीदेखील उपलब्ध करण्यात आली आहेत. इमारतीमध्ये लॉकर, कपडे धुण्याचे यंत्र, तसेच लहान मुलांसाठी मनोरंजनाच्या सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत.