सिंचन घोटाळ्यावरून भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीला लक्ष्य केले असतानाच १९९५ पासून झालेल्या घोटाळ्यात गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे व महादेव शिवणकर हेच जबाबदार होते, असा प्रतिहल्ला राष्ट्रवादीने गुरुवारी केला.
कृष्णा खोरे घोटाळ्याची चौकशी केलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहवालात तत्कालीन उच्चपदस्थांवर ठपका ठेवण्यात आला आहे.  तत्कालीन जलसंपदामंत्री शिवणकर यांच्यावर आरोप झाल्यावर त्यांचे खाते काढून घेण्यात आले. मग हे खाते एकनाथ खडसे यांच्याकडे होते. काही काळ हे खाते मुंडे यांच्याकडेही होते. कृष्णा खोऱ्याच्या कामांसाठी २४ टक्के दराने रोखे काढण्यात आले होते. युती सरकारच्या काळात कृष्णा खोऱ्यातील कामांमध्ये मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. चितळे समितीसमोर युती सरकारच्या काळातील घोटाळ्यांची चौकशी सुरू आहे. यामुळे भाजपच्या मंत्र्यांवर ठपका येऊ शकतो, असे मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मांडले.
मुंडे यांचा उलटा प्रवास
निवडणुकीत आठ कोटी खर्च केल्याची कबुली केल्याबद्दल निवडणूक आयोगाने मुंडे यांना नोटीस बजाविली. मुंडे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपात्र ठरले. मुंडे यांचा हा उलटा प्रवास असून, आगामी लोकसभा निवडणुकीतही याचीच पुनरावृत्ती होईल, असे मतही मलिक यांनी व्यक्त केले. भाजपने पवार यांना लक्ष्य केल्यावर राष्ट्रवादीने मुंडे यांच्यावर तोफ डागली आहे.