कॉंग्रेसने दगाफटका करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोनदा लोकसभा निवडणुकीत पराभूत केले, परंतु डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यांना पश्चिम बंगालमधून सन्मानपूर्वक राज्यसभेवर निवडून पाठविले, या भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विधानावरुन एका नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. मुंडे इतिहासाचा विपर्यास करुन जनतेची दिशाभूल करीत आहेत, अशी टीका करीत रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर व बसपचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.सुरेश माने यांनी त्यांचा निषेध केला आहे.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची उमेदवारी जाहीर करण्यासाठी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंडे यांनी काही ऐतिहासिक संदर्भ दिल्याने त्यावरुन राजकीय वाद सुरु झाला आहे. मुंडे यांच्या या विधानाचा आनंदराज आंबेडकर यांनी खरपूस समाचार घेतला आहे. आंबेडकरी जनतेला दिशाहीन व विचारहीन करण्याची सुपारी घेतल्याच्या बदल्यात आठवले यांना भाजपने खासदारकी दिली आहे. परंतु मुंडे यांनी शामाप्रसाद मुखर्जी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात केलेले विधान तद्दन खोटे आणि खोडसाळपणाचे आहे. १९४६ मध्ये बंगाल प्रांतातून बाबासाहेब त्यांच्या शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशनचे नेते जोगेंद्र मंडल यांच्या सहकार्याने घटना समितीवर निवडून गेले होते. त्यानंतर १९५२ मध्ये मुंबई प्रांतिक विधीमंडळातून त्यांची राज्यसभेवर निवड झाली होती. मग मुखर्जी यांचा त्याच्याशी काय संबंध असा त्यांनी मुंडे यांना सवाल केला आहे.   
बसपचे सुरेश माने यांनी म्हटले आहे की, रामदास आठवले यांना काय करायचे ते भाजपने करावे, त्याबद्दल कुणाचे काही म्हणणे नाही. परंतु मुंडे यांनी इतिहासाची मोडतोड करुन धांदात खोटी व खोडसाळ विधाने करु नयेत.
फाटे कशाला फोडता-मुंडे
शामाप्रसाद मुखर्जी यांनी बाबासाहेबांना राज्यसभेवर निवडून जाण्यास मदत केली होती, असे रामदास आठवले यांचे म्हणणे होते, त्याला आपण समर्थन दिले व इतिहासाची पुनरावृत्ती झाली, असे म्हटल्याचे गोपीनाथ मुंडे यांनी मान्य केले. मात्र भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याला डावलून आठवले यांना खासदारकी दिली, याचे कौतुक करण्याऐवजी असे फाटे कशाला फोडता, असा सवाल त्यांनीही टीकाकारांना केला आहे.