लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : करोना काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आलेले मुंबईमधील गोराई परिसरातील पक्षी उद्यान पुन्हा खुले करण्यात आले आहे. या उद्यानात सुमारे ७० विदेशी प्रजातींच्या पक्ष्यांचे दर्शन मुंबईकर, तसेच देश-विदेशातील पर्यटकांना घडणार आहे. उद्यानाचा पर्यावरणपूरक आवार, तेथील विवध पक्षी प्रजातींमुळे हे पक्षी उद्यान अभ्यासकांसाठी महत्त्वाचे आहे.

मुंबईमधील गोराई परिसरातील पक्षी उद्यान करोना काळात सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून बंद करण्यात आले होते. आता हे उद्यान पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. या उद्यानामधील प्रजातींची संपूर्ण यादी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र या उद्यानात ७० विवध प्रजातींचे ५०० हून अधिक पक्षी येथे आहेत. यामुळे या उद्यानाने मुंबईकरांना काही दिवसांतच भुरळ पाडली होती.

स्थानिक, तसेच विदेशी पक्ष्यांसाठी अधिवास निर्माण करणे हे या उद्यानाचे उद्दिष्ट आहे. हे उद्यान मुंबईकरांमध्ये पक्षी संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यास मदत करणार आहे. उद्यानातील प्रत्येक पक्ष्यासाठी त्याला पूरक असे पिंजरे तयार करण्यात आले आहेत. जेणेकरून त्या पक्ष्यांनाही योग्य अधिवास मिळेल आणि पर्यटकांनाही उद्यानाची सफर करताना अडचण निर्माण होणार नाही.

उद्यानातील पक्षांची दर १५ दिवसांनी तपासणी

उद्यानातील प्रत्येक पक्ष्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी उद्यान प्रशासनाने एक विशिष्ट वेळापत्रक तयार केले आहे. यानुसार, दर १५ दिवसांनी प्रत्येक पक्ष्याची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. पक्ष्यांचे वजन आणि त्यांच्या पोषणमूल्यांच्या गरजा निश्चित करणे आदी बाबी त्यात समाविष्ट आहेत. याचबरोबर कोणत्याही पक्ष्याला तपासणीअंती आरोग्य समस्या उद्भवल्यास त्यावर तात्काळ वैद्यकीय उपचार केले जातील. यामुळे पक्ष्यांच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि त्याचे आयुर्मानही वाढेल.

उष्णतेचा सामना करण्यासाठी खास सोय

सध्या मुंबईकरांना असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. नागरिकांबरोबरच पशु-पक्ष्यांनाही याचा त्रास होत आहे. उद्यानातील पक्ष्यांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी पिंजऱ्यात विशिष्ट प्रकारचे पाणवठे तयार करण्यात आले आहेत. याचबरोबर त्यांच्या आहारात काही बदल करण्यात आले आहेत. जेणेकरून त्यांना उष्णतेचा त्रास होणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संपूर्ण आठवडाभर पर्यटकांसाठी खुले

हे पक्षी उद्यान आठवडाभर पर्यटकांसाठी खुले असणार आहे. उद्यानाला भेट देण्याची वेळ, प्रवेश खर्च आणि नियमावलीची माहिती उद्यानाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

उद्यानाची वैशिष्ट्ये

  • विविध प्रजाती : पक्षी उद्यानात विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. त्यात स्थानिक, तसेच विदेशी पक्ष्यांचा समावेश आहे. या उद्यानात रंगीबेरंगी आणि दुर्मिळ पक्ष्यांची संख्या मोठी आहे.
  • पक्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धन : पक्ष्यांच्या संरक्षण आणि त्यांचे संवर्धन हे पक्षी उद्यानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • शिक्षण आणि जनजागृती : या उद्यानात आलेल्या पर्यटकांना पक्ष्यांच्या संरक्षणाबद्दल आणि त्यांच्या प्रजातींबद्दल माहिती देण्यात येते. येथे विविध शैक्षणिक कार्यशाळा, प्रदर्शने, आणि सूचना फलकांद्वारे पक्ष्यांबद्दल अधिक माहिती मिळवता येते.