मुंबई : गोरेगाव येथे पश्चिम द्रुतगती महामार्गानजीकच्या महानंदा डेअरीच्या शीतगृहात बुधवारी रात्री ९ च्या सुमारास वायुगळती सुरू झाली. महानंद डेअरीच्या शीतगृहातील ५०० चौरस फूट क्षेत्रफळात वायुगळती झाली होती. अग्निशमन दल व अन्य यंत्रणांनी युद्धपातळीवर बचावकार्य करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

गोरेगाव येथील महानंदा डेअरीमधील दुधावर प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार केली जातात. या डेअरीतील शीतगृहात बुधवारी रात्री अमोनिया वायूच्या एका सिलिंडरमधून अचानक गळती सुरू झाली. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी, तसेच रासायनिक गळती हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले. डेअरीच्या फॅक्टरीतील सर्व कामगार – कर्मचाऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. बुधवारी रात्री १० वाजून ५६ मिनिटांनी परिस्थिती नियंत्रण आल्याचे सूत्रांनी सांगितले. सद्यस्थितीत अग्निशमन दलातर्फे संबंधित परिसरात निर्जंतकीकरण करण्याचे काम सुरू आहे.