Mumbai Goregaon Fire : मुंबईतील गोरेगावच्या उन्नत नगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून या दुर्घटनेत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच या आगीत ४० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. इमारतीला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान त्वरीत मदतीसाठी दाखल झाले आणि त्यांनी इमारतीतल्या ३० नागरिकांना सुखरूप वाचवलं आहे. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या पार्किंगमध्ये कागद आणि कापडाचे गठ्ठे होते. त्यामुळे आग लागली असं प्राथमिक स्तरावर निदर्शनास आलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी सांगितलं.

या दुर्घटनेतील मृत आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहवेदना प्रकट केली आहे. तसेच या मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या आगीत जखमी झालेल्या नागरिकांवर शासकीय खर्चाने उपचार केले जातील, असंही राज्य सरकारने जाहीर केलं आहे. राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकारनेही या दुर्घटनेची दखल घेतली असून मृतांच्या कुटुबीयांना मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींनाही मदत केली जाणार असल्याचं पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया शेअर केली आहे. यामध्ये म्हटलं आहे की मुंबईतल्या गोरेगावमधल्या आगीच्या दुर्घटनेतील जीवितहानी वेदनादायी आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक संवेदना. तसेच जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं, अशी मी प्रार्थना करतो. सर्व पीडितांना आवश्यक ती मदत प्रशासन करत आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना पीएमएनआरएफमधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना प्रत्येकी ५०,००० रुपये दिले जातील.