मुंबई– १३ वर्षांच्या मुलीने धाडस दाखवून पोलिसांना माहिती देऊन वडिलांच्या हत्येचा कट उघडकीस आणला आहे. आरे पोलिसांनी याप्रकरणी मुलीच्या आई आणि प्रियकरावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. अनैतिक प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृत भरत अहिरे (४०) हे रंगभूषा कलाकार होते. ते पत्नी राजश्री (३५) आणि दोन मुलांसह गोरेगावला रहात होते. त्यांची मोठी मुलगी १३ वर्षांची तर मुलगा ५ वर्षांचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजश्री यांचे परिसरात राहणाऱ्या चंद्रशेखर पडयाची नावाच्या व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध होते. त्यामुळे पतीचा काटा काढण्यासाठी राजश्री आणि चंद्रशेखर यांनी एक योजना आखली. त्यानुसार चंद्रशेखर मला अश्लील संदेश पाठवून त्रास देत असल्याचे राजश्रीने पती भरत यांना सांगितले. चंद्रशेखऱ हा त्यांच्या परिचयाचा होता. भरत यांनी याबाबत चंद्रशेखर याला फोन करून जाब विचारला. तेव्हा चंद्रशेखरने त्यांना भेटायला बोलावले.
मारहाण करत असताना मुलीने पाहिले…
१५ जुलै रोजी रात्री १० वाजता गोरेगाव पूर्वेच्या आरे कॉलनी मधील एकता नगर येथील सार्वजनिक शौचालयाजवळ ही भेट ठरली होती. तेथे भरत आणि राजश्री गेले. ठरलेल्या योजनेनुसार चंद्रशेखर आणि त्याचा एक रंगा नावाचा मित्राने भरत याला बेदम मारहाण केली. त्यात भरत गंभीर जखमी झाले. काही वेळाने परिसरातील लोक जमू लागल्यानंतर दोघे पळून गेले. हा प्रकार कुणाला सांगितल्यास गंभीर परिणाम होतील अशी धमकीही त्या दोघांनी दिली. राजश्री पतीला रुग्णालयात न नेता घरी घेऊन आली. दुचाकीवरून पडल्याने अपघात झाला असे तिने शेजाऱ्यांना सांगितले. मात्र हा प्रकार नेमका त्यांच्या १३ वर्षांच्या मुलीने लांबून पाहिला होता.
३ दिवस घरातच ठेवले
जखमी पतीला राजेश्रीने उपचार न करता ३ दिवस घरातच ठेवले होते. तेथे त्यांची प्रकृती ढासळत होती. त्यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. शेवटी मुलीने तिच्या काकूला हा प्रकार सांगितला. त्यांनी मग भरतला मालाड येथील एका रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी मुलीने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. माझ्या वडिलांचा दुचाकी अपघात झालेला नसून दोन व्यक्तींनी त्यांना मारहाण केल्याचे मुलीने सांगितले. दोघेजण माझ्या वडिलांना मारत असताना आई बघत होती असेही या मुलीने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी मग या प्रकरणी अधिक चौकशी केली. तेव्हा राजश्रीने या प्रकाराची कबुली दिली. पोलिसांनी तिच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
२४ दिवसांनी मृत्यू..
दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरू असताना भरत याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी राजश्री अहिरे, चंद्रेशखर आणि त्याचा साथीदार रंगा यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५ (२), ३५१(२), ११७ (२) आणि ३(५) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. नंतर हत्येचे कलम वाढविण्यात आले. भरत याच्या १३ वर्षांच्या मुलीने माहिती दिल्यानेच हा प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. राजश्रीला अटक करण्यात आली असून दोघांचा शोध सुरू आहे.