मुंबई– गोरेगावमधील एका मदरशातून ११ वर्षीय मुलाने पलायन केले आहे. मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी केली आहे. गोरेगाव पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून या मुलाचा शोध घेत आहे. हा मुलगा स्वत:हून पळून गेला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मागील महिन्यात मालाडमधील एका मदरशातून ४ अल्पवयीन मुलांनी अशाच प्रकारे पलायन केले होते.

अरमान राईन (३४) याचा ११ वर्षांचा मुलगा गोरेगावच्या मोतीलाल नगर येथील एसडीआय एज्युकेशन सेंटर या मदरसा मध्ये शिक्षण घेत आहे. या मदरसा मध्ये देशभराच्या विविध भागातून आलेली मुले शिकत असतात. या मदरशात गुरूवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सुट्टी असते. त्यामुळे त्याचे वडील त्याला महिन्यातून एकदा घरी घेऊन येतात.

३१ जुलै रोजी अरमान यांनी मुलाला घरी आणले होते. दोन दिवस तो घरी होता. ते शनिवार २ ऑगस्ट रोजी मुलाला मदरशात सोडण्यासाठी आले होते. मुलाला सोडून ते पुन्हा कामावर निघून गेले. सायंकाळी ५ वाजता त्यांना मदरशातील शिक्षक रसई अहमद यांचा फोन आला. त्यांचा मुलगा मदरशात नसल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वत्र मुलाचा शोध घेण्यात आला. परंतु तो कुठेही आढळला नाही. कुणीतरी फूस लावून त्याला पळवून नेले असल्याची तक्रार अरमान राईन याने गोरेगाव पोलीस ठाण्यात दिली होती.

यापूर्वीही पळून जाण्याचा प्रयत्न

मुलाला धार्मिक शिक्षण मिळावे यासाठी अरमान याने मुलाला पूर्वी भिवंडी येथील मदरशात ठेवले होते. तेथूनही तो पळून घरी आला होता. त्याला मदरशातील शिक्षण आवडत नव्हते. त्यामुळे तो पळून गेला असावा अशी शक्यता गोरेगाव पोलिसांनी व्यक्त केली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. लवकर त्याला शोधून काढू असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सर्व रेल्वे स्थानके, बस स्थानके, अन्य धार्मिक स्थळे आदी ठिकाणी शोध घेण्यास सुरवात करण्यात आली आहे.

मालवणीतील मदरशातून ३ मुलांचे पलायन

मागील महिन्यात ८ जुलै रोजी मालाड पूर्वेच्या मालवणी येथील एका मदरशातून ४ मुलांनी पलायन केले होते. मूळ उत्तर प्रदेशातील असलेली ती चारही मुले १२ ते १६ वर्ष वयोगटातील होती. मागील दिड वर्षातून या मदरशात शिक्षणासाठी आली होती. मालवणी पोलीस त्यांचा शोध घेत होते. काही दिवसांनी ही चारही मुले राजस्थानच्या अजमेर येथील दर्गा परिसरात आढळली होती. मदरशातील शिक्षणपध्दती आवडत नसल्याने त्यांनी पळ काढला होता, असे पोलिसांनी सांगितले होते. या मुलांना नंतर बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले होते.