मुंबई : वरळी – शिवडी उन्नत रस्त्यासाठी प्रभादेवी येथील जुना पूल तोडण्याच्या कामामुळे सध्या मोठा वाद उद््भवला असून येत्या काळात याचीच पुनरावृत्ती गोरेगावमध्येही होणार आहे. मुंबई महानगरपालिकेने वर्सोवा – दहिसर – भाईंदर हा प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पासाठी गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल अडथळा बनला आहे. अवघ्या सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटी रुपये खर्च करून बांधलेला उड्डाणपूल तोडून या ठिकाणी द्विस्तरीय उड्डाणूपल बांधण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

शिवडी – वरळी उन्नत मार्गासाठी प्रभादेवीचा (एलफिन्स्टनचा) पूल पाडण्याच्या निर्णयामुळे रहिवाशांमध्ये संताप आहे. त्यातच आता आणखी एका विकासकामासाठी जुना पूल पाडावा लागणार आहे. मुंबई महापालिकेने सागरी किनारा मार्गाच्या उत्तर मुंबईतील भागाचे काम सुरू केले आहे. वर्सोवा – दहिसर आणि पुढे भाईंदरपर्यंत हा मार्ग जाणार आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच शासकीय जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. किनारपट्टी नियमन क्षेत्राबाहेरील (NON CRZ) भागामध्ये प्रत्यक्षात कामे सुरू झाली आहेत. मात्र या सागरी किनारा मार्गामध्ये गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल अडथळा ठरू लागला असून हा पूल पाडून त्या ठिकाणी नवीन द्विस्तरीय पूल उभारण्याचा पर्याय मुंबई महापालिका प्रशासनाने निश्चित केला आहे. हा पूल न पाडता काही नियोजन करता येते का यावर गेले सहा – सात महिने खल सुरू होता. मात्र आता हा पूल पाडणे हेच वेळ आणि खर्चाच्या दृष्टीकोनातून योग्य असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा पूल तोडावा लागणार आहे. याबाबतचे नियोजन मुंबई महापालिकेने केले असल्याचे समजते. मुंबई महापालिकेने सात वर्षांपूर्वीच तब्बल २७ कोटी रुपये खर्चून हा उड्डाणपूल बांधला होता.

गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल ‘एमटीएनएल उड्डाणपूल’ नावानेही ओळखला जातो. हा उड्डाणपूल रेडिसन हॉटेलपासून रुस्तमजी ओझोनदरम्यान आहे. या पुलाचे उद्घाटन २०१८ मध्ये करण्यात आले होते. हा पूल पाडून सागरी किनारा मार्ग प्रकल्पांतर्गंत येथे दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. दुमजली पुलाच्या वरील मार्ग मालाड माईंडस्पेस येथून दिंडोशी कोर्टापर्यंत पोहोचेल आणि त्याखालील मार्गिका वीर सावरकर उड्डाणपुलाची जागा घेईल.

दरम्यान, उड्डाणपूल पाडावा लागू नये यासाठी काही पर्यायांची चाचपणीही करण्यात आली. मात्र उड्डाणपूल पाडल्याशिवाय सागरी किनारा मार्गाचे काम पुढे सरकणे अशक्य आहे. त्यामुळे हा उड्डाणपूल पाडण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेतील सूत्रांनी दिली. या पाडकामाचा अंतिम प्रस्ताव मुंबई महापालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

वीर सावरकर पूलाच्या वरून वर्सोवा – दहिसर प्रकल्पाची रेषा जात आहे. मूळ प्रस्तावात रस्त्याच्या दोन बाजूला दोन खांब आणि वर पूल अशी रचना केली होती. मात्र तसे केले तर पुलाच्या दोन्ही बाजूला वाहतुकीसाठी जागाच उरत नाही. त्यामुळे एका खांबावर पूल उभारण्याचा पर्याय पुढे आला. त्यात वीर सावरकर पुलाचा अडथळा येत आहे. हा पूल तसाच ठेवून वरून उन्नत मार्ग नेण्याच्या पर्यायाचा आम्ही अभ्यास केला. त्यात सध्याच्या पुलाला छेद देऊन त्यातून खांब वर आणणे व त्यावर पूल बांधणे हा पर्याय होता. हे करणे शक्य आहे. पण यासाठी जास्त वेळ लागू शकतो. त्याच्या तुलनेत पूल तोडून नवीन बांधला, तर त्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च कमी आहे. सध्या तरी हाच योग्य पर्याय असल्यामुळे तसे प्रस्तावित केले आहे. – अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगरपालिका