‘गोष्ट मुंबईची’च्या गेल्या तीन भागांमध्ये आपण आरे कॉलनी आणि मरोळचा परिसर पिंजून काढला. या परिसरात सापडणाऱ्या प्राचीन मंदिरांच्या अवशेषांचा शोध घेतला. मंदिरे वगळता मुंबईची तत्कालीन समृद्धी सांगणारे इतरही अनेक पुरावे आरेच्या परिसरात सापडतात. किंबहुना त्यातील अनेक पुरावे हे आरे आणि मरोळच्या सीमेलगत सापडतात. यात गधेगळ, वीरगळ आणि धेनूगळ यांचा समावेश आहे.
गोष्ट मुंबईची भाग : १४६- आरे, मरोळमधले मध्ययुगातील समृद्ध मुंबईचे पुरावे!
धेनू म्हणजे गाय आणि गळ हा शब्द अनेकदा दगड या अर्थीही वापरला जातो. अर्ध पुरुष उंचीच्या या दगडावर अनेकदा गाय आणि वासराचे चित्रण असते. हे चित्रण म्हणजे तत्कालीन कालखंडातील राजाने दिलेल्या दानाचा पुरावाच असतो. अशा प्रकारचे मध्ययुगातील धेनूगळ आपल्या अधिक संख्येने आरे- मरोळच्या परिसरात सापडतात. आरेचा परिसर हा मुंबई किंवा तत्कालीन साष्टीच्या बेटावरील सर्वात समृद्ध परिसर होता, हेच यातून लक्षात येते. हे धेनूगळ, वीरगळ आणि गधेगळ आरेच्या मध्ययुगातील समृद्धीवर शिक्कामोर्तबच करणारे आहेत. त्यातील काही स्थानिकांनी संरक्षित केले आहेत. तर काही अद्यापही दुर्लक्षित आहेत, अशा या धेनूगळांचा घेतलेला हा शोध, पाहायलाच हवा!
मुंबईतील वारसा स्थळांचा इतिहास आणि शहरातील अद्याप उजेडात न आलेल्या जागांविषयी सविस्तर, रंजक माहिती जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या गोष्ट मुंबईची या विशेष व्हिडिओ सीरीजला नक्की पाहा.