मुंबई : यंदा गणेशोत्सवातील चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरण्यास सरकारने सोमवारी परवानगी दिली. गणणती आगमन आणि विसर्जनाच्या सर्व मार्गाची तातडीने डागडुजी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. दहीहंडी, गणेशोत्सव उत्साहाने, शांततेत, जल्लोषात साजरे करतानाच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे दहीहंडी व सार्वजनिक गणेशोत्सवाबाबत आढावा बैठक सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गणेशोत्सवादरम्यान दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन, तसेच ५व्या, ९व्या आणि अनंत चतुर्दशी असे चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाला पवानगी देण्यात आल्याची माहिती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी बैठकीनंतर दिली. मुंबईमधील सर्व रस्ते, गल्ली बोळांमध्ये स्वच्छता ठेवण्याची मुंबई महापालिका आयुक्तांना यावेळी सूचना देण्यात आल्या.

हेही वाचा >>>म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२३ : गणेशोत्सव, दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर विजेत्यांचा नव्या घरात प्रवेश, ‘इतक्या’ विजेत्यांना तात्पुरत्या देकारपत्राचे वितरण

जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिकाऱ्यांनी दहीहंडी, गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात व सकारात्मक पद्धतीने मार्ग काढावा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. सुमारे ७५ हजार गोविंदांना राज्य शासनाच्या माध्यमातून विम्याचे सुरक्षा कवच देण्यात आले असून उर्वरित गोविंदाचाही विमा काढण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. अनेक वर्ष सातत्याने गणेशोत्सवाचे आयोजन करीत असलेल्या मंडळांना एकाचवेळी पाच वर्षांसाठी परवानगी देण्याबाबत कार्यवाही करण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी सूचित केले. बैठकीला मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांच्यासह मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, दहीहंडी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुख दूरचित्र संवादाच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

हेही वाचा >>>महारेरा मानांकन ‘सारणी’ म्हणून ओळखले जाणार, दर सहा महिन्यांनी मानांकन सार्वजनिक होणार

आदेश काय?

’राज्यातील सर्व गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवा

’प्रमुख रस्त्यांची डागडुजी करा. आगमन व विसर्जन मार्गावरील मध्ये येणाऱ्या फांद्यांची छाटणी करा

’रस्त्यात केबल येणार नाही, याची दक्षती घ्या. गणेश मंडळांना वीज जोडण्यांमध्ये अडचण येऊ देऊ नका