मुंबई : वारंवार मूत्रवाहिनीमध्ये होणाऱ्या संसर्गावर विविध उपचार करूनही बरे वाटत नसल्याने ६४ वर्षीय संपत प्रफुल त्रस्त झाले होते. मात्र संपत यांना रक्तदाब, रक्त पातळ करण्याची औषधे सुरू असल्याने त्यांच्यावर पारंपरिक प्रोस्टेट शस्त्रक्रिया करणे अत्यंत धोकादायक होते. मात्र मुंबईतील रुग्णालयाने ग्रीनलाइट लेझर प्रोस्टेटेक्टॉमी या आधुनिक उपचार पद्धतीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यामुळे रक्त पातळ करणारी औषधे बंद न करता त्यांच्या शरीरातील अतिरिक्त प्रोस्टेट ऊतक सुरक्षितपणे काढून डॉक्टरांनी त्यांना जीवदान दिले.मूत्रवाहिनीच्या संसर्गाचा त्रास असल्यामुळे संपत प्रफुल यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान प्रफुल यांच्यावर यापूर्वी हृदय झडप बदलण्याची शस्त्रक्रिया, हिप सर्जरी झाली होती. त्यांना उच्च रक्तदाब होता. तसेच ते रक्त पातळ करणारी औषधे घेत होते.
यामुळे त्यांच्यावर पारंपरिक प्रोस्टेट शस्त्रक्रिया केल्यास अतिरक्तस्राव होण्याचा मोठा धोका होता. औषधे बंद केल्यास झडपांमध्ये गाठ तयार होणे (व्हॉल्व थ्रॉम्बोसिस), मेंदूत स्ट्रोक येणे किंवा फुफ्फुसात रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होणे (पल्मोनरी एम्बोलिझम) यासारखी जीवघेणी गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे डॉ. मंगेश पाटील आणि त्यांच्या पथकाने ग्रीनलाइट लेझर प्रोस्टेटेक्टॉमी या आधुनिक, कमी दुखापत करणाऱ्या उपचाराला प्राधान्य दिले. या तंत्रज्ञानाच्या मदतीने शस्त्रक्रिया करताना रक्त पातळ करणारी औषधे बंद न करता अतिरिक्त प्रोस्टेट ऊतक सुरक्षितपणे काढण्यात डॉक्टरांना यश आले.संपत प्रफुल यांच्यावर ग्रीनलाइट लेझर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना मूत्राच्या अडथळ्यामुळे होणाऱ्या त्रासातून त्वरित आराम मिळाला. या उपचारपद्धतीची कमी दुखापत करणाऱ्या गुणधर्मामुळे त्यांची प्रकृती लवकर सुधारली. पूर्वीप्रमाणे त्यांचा दैनक्रम सुरू झाला.
काय आहे ही प्रक्रिया
ग्रीनलाइट लेझर प्रोस्टेटेक्टॉमी ही प्रक्रिया अत्याधुनिक लेझरच्या साहाय्याने अतिरिक्त प्रोस्टेट ऊतक काढून टाकते. यामध्ये बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लेशिया (बीपीएच) म्हणजेच प्रोस्टेट वाढीचे त्रासदायक लक्षणे कमी होतात. विशेष म्हणजे, उपचारानंतर रुग्ण पूर्वीच्या गंभीर आजारासंदर्भातील अँटीकोआग्युलंट औषधोपचारावरही राहू शकतो.
सुरक्षित उपचारासाठी सहाय्यभूत
अन्य वैद्यकीय समस्यांमुळे पारंपरिक प्रोस्टेट शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश येत नाही. अशा उच्च धोकादायक रुग्णांवर ग्रीनलाइट लेझर प्रोस्टेटेक्टॉमी ही उपचार पद्धती सुरक्षित आणि प्रभावी पर्याय ठरते. ग्रीनलाइट लेझर प्रोस्टेटेक्टॉमी उपचार पद्धती रुग्णावर उत्तम आणि सुरक्षित उपचार करण्यास सहाय्यभूत ठरत असल्याचे डॉ. मंगेश पाटील यांनी सांगितले.