आठवड्यातील ७ दिवस मदतवाहिनी कार्यरत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद््भवलेल्या संकटात राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले असून त्याचा परिणाम उद्योग व्यवसायावर झाला असून काही उद्योगधंदे ठप्प झाले आहेत, तर बहुतांश उद्योग कमी क्षमतेने सुरू आहेत. याचा संघटित, असंघटित क्षेत्रांतील कामगारांबरोबरच, स्थलांतरित कामगार, स्वयंरोजगार करणाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी कामगार विभागाने तक्रार निवारण कक्ष सुरू केला आहे.

कामगार विभागाच्या जिल्हानिहाय मदत क्रमांकावर संपर्क  करून कामगारांना त्यांचे प्रश्न मांडता येतील. ही सुविधा आठवड्यातील सातही दिवस सुरू राहणार आहे. त्याचबरोबर परप्रांतीय मजुरांसाठीही कामगार विभागाने रेल्वे स्थानकांवर मदत केंद्रे सुरू केली आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस, सीएसएमटी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल आणि ठाणे या स्थानकांत विभागाने कामगार मदत केंद्र सुरू केले आहे. मुंबईत परतल्यानंतर कामावरून कमी केल्याच्या अथवा वेतनाबाबत समस्या उद््भवल्यास संपर्क साधण्याचे आवाहन विभागाने केले आहे. दरम्यान परतीच्या प्रवासात कामगारांची उपासमार होऊ नये याचीही काळजी कामगार विभाग घेत असून रेल्वे स्थानकांवरच्या मदत केंद्रात गरजूंना अन्नाची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या देण्यात येत आहेत.

कामगारांना २४ कोटींची देणी

गेल्या वर्षी टाळेबंदीनंतर उद्भवलेल्या समस्येमुळे अनेक ठिकाणी मालकांनी कामगारांची देणी थकविली होती. टाळेबंदी शिथिल होऊ लागताच कामगारांनी याबाबत कामगार विभागाकडे तक्रारी दाखल केल्या. एकट्या कोकण विभागातील सात जिल्ह्यांतून या वर्षी एप्रिलपर्यंत ६८०२ कामगारांनी तक्रारी दाखल केल्या. या तक्रारींवर कारवाई करून विभागाने कामगारांना त्यांच्या हक्काचे २४ कोटी रुपये कंपन्या आणि कंत्राटदाराकडून मिळवून दिले, अशी माहिती कोकण विभागाच्या अपर कामगार आयुक्त शिरीन लोखंडे यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grievance redressal center by the department of labor akp
First published on: 26-04-2021 at 01:48 IST