मुंबई : छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात येईल. चौकशी समितीचा अहवाल येताच सर्व दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली.
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे व चित्रा वाघ यांनी अल्प सूचना प्रश्नाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला होता. आक्रमक विरोधक आणि घटनेचे गांभीर्य पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चेत हस्तक्षेप करीत कठोर कारवाईची घोषणा केली.
छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत गंभीर आणि भयावह आहे. या प्रकरणी चौकशीसाठी तीन वरिष्ठ महिला पोलिस निरीक्षकांच्या समितीची स्थापना करण्यात आली असून, त्यांनी ८० मुलींशी संवाद साधला आहे. सुरुवातीला त्या बोलण्यास तयार नव्हत्या, मात्र हळूहळू त्यांनी या प्रकरणाबाबत काही गंभीर माहिती दिली. त्या नंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, इतर संबंधितांवरही कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
संबंधित संस्थेच्या मान्यतेची मुदत संपली असेल तर ती पुन्हा देण्यात येणार नाही आणि मान्यता असेल तर रद्द करण्यात येईल. समितीचा अंतिम अहवाल लवकरच प्राप्त होणार असून, त्यानंतर दोषी ठरलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई केली जाईल. उच्च न्यायालयानेही या प्रकरणाची स्वताःहून दखल घेतली असून, विशेष निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. उच्च न्यायालयाच्या कार्यवाही सोबतच सरकार स्वतंत्रपणे चौकशी करीत आहे. यामध्ये कोणतीही व्यक्ती, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.
मुलींचे धर्मांतर, लैंगिक शोषणाचा आरोप
चित्रा वाघ, अंबादास दानवे यांनी या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला. बालसुधारगृहातील तेरा मुली पळाल्या. त्यांच्या बेडरुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मुलींच्या पोटात दुखू लागल्यास त्यांची गर्भधारणा किटद्वारे तपासणी केली जाते. त्यांचे लैंगिक शोषण होत असतानाच. मुलींना जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म स्विकारण्यास भाग पाडले जात आहे. मुलींच्या अंगावर क्रॉसचे चिन्ह काढणे, अंगावर पवित्र पाणी शिंपडणे, असे प्रकार केले जात आहेत. शेख नावाचा इसम वारंवार बालसुधारगृहात प्रवेश करीत होता. संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना मुलींचा छळ होत आहे, हे माहिती असूनही छळ होऊ दिला. त्यामुळे त्यांना बडतर्फ करा. गुन्हा दाखल करा. बालसुधारगृहाची मान्यता रद्द करा. धर्मांतरासाठी जबरदस्ती करणाऱ्या सिस्टर अलका यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी आग्रही मागणी वाघ आणि दानवे यांनी केली.