मुंबई : हाजी अलीवरून परळ, दादर आणि पुढे मांटुंगा, माहिमला जाणाऱ्या वाहनचालक-प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या प्रवासासाठी ३० मिनिटे वा कधी कधी याहीपेक्षा अधिक वेळ लागतो. पण आता लवकरच हाजी अली – परळ प्रवास अवघ्या पाच मिनिटांत पार करता येणार आहे. मुंबई सागरी किनारा मार्ग परळशी जोडून हाजी अली – परळ प्रवास अतिजलद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार हाजी अली – परळ दरम्यान १.५ किमी लांबीचा उन्नत रस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासंबंधीचा प्रस्ताव सध्या प्राथमिक स्तरावर असून लवकरच हा प्रकल्प मार्गी लावण्याच्यादृष्टीने पुढील कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे.

सागरी किनारा मार्गामुळे प्रिन्सेस स्ट्रिटवरून हाजी अली, वरळी आणि पुढे वांद्रे येथे जाणे सोपे झाले आहे. मात्र हाजी अलीवरून पुढे परळ, दादर, मांटुंगा, माहिमला जाणाऱ्या वाहनांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. तर माहिम, माटुंगा, दादर, परळवरून हाजी अली जंक्शन येथून सागरी मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीतून जावे लागते. ही बाब लक्षात घेत राज्य सरकारने सागरी किनारा मार्ग परळशी उन्नत रस्त्याने जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सागरी किनारा मार्गाच्या हाजी अली जंक्शन आंतरबदल मार्ग ते परळ दरम्यान १.५ किमी लांबीचा उन्नत रस्ता राज्य सरकारच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्तावित केला आहे. या सहा पदरी उन्नत मार्गामुळे भविष्यात माहिम, माटुंगा, दादर आणि परळवरून सागरी मार्गावर येणे-जाणे आणि पुढे मरिन ड्राईव्हकडे जाणे सोपे, अतिजलद होणार आहे. या प्रस्तावित उन्नत मार्गासंदर्भात नुकतीच उप मुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली.

अंदाजे १.५ किमी लांबीचा हा उन्नत रस्ता लाला लजपत राय रस्त्यावरील हाजी अली जंक्शन येथू सुरु होऊन महालक्ष्मी रेसकोर्सच्या बाजूने, एनएससीय डोमजवळून पुढे सेनापती बापट मार्गावरील ई मोसेस रोडच्या टोळाजवळ, परळ येथे येऊन संपणार आहे. सध्या माहिम, मांटुगा, दादर आणि परळवरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना मोठा वळसा घालावा लागतो. त्यामुळे या प्रवासासाठी वाहनांना ३० मिनिटे वा त्यापेक्षा अधिक वेळ लागतो. पण हा उन्नत रस्ता तयार झाल्यास हाजी अली – परळ अंतर केवळ ५ मिनिटांत पार करता येणार आहे. या प्रकल्पासाठी ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे. मात्र या प्रकल्पाची अंमलबजावणी नक्की कोण करणार हे अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनच या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सेनापती बापट मार्ग – लाला लजपत राय मार्ग उन्नत रस्ता प्रकल्पामुळे दादर – नरिमन पॉइंट प्रवास सुकर होणार आहे. हा प्रकल्प मुंबईच्या भविष्याच्यादृष्टीने एक दूरदर्शी पाऊल आहे. वाहतूक कोंडी दूर करण्याच्यादृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पासाठी कोणतेही भूसंपादन करावे लागणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.