Halal Lifestyle Township in Mumbai Ad Sparks Row: मुंबईपासून काही किमी अंतरावर असलेल्या नेरळ येथे एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या जाहिरातीत हलाल लाइफस्टाइलचा उल्लेख झाल्यानंतर राजकीय वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पाच्या जाहिरातीमध्ये येथे हलाल जीवनशैलीचा अवलंब केला जात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. धर्माच्या आधारावर विशिष्ट बाबीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप होत असून टिका झाल्यानंतर विकसकाने ही जाहिरात सोशल मीडियावरून हटवली आहे.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे (NCPCR) माजी अध्यक्ष प्रियांक कानूंगो यांनी त्यांच्या एक्स हँडलवर सदर जाहिरातीचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी ‘नेशन विदिन द नेशन’ असा उल्लेख करून एका राष्ट्राच्या आत दुसरे राष्ट्र निर्माण करण्याचा हा प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे.

जाहिरातीमध्ये काय दिसते?

सदर जाहिरातीचा व्हिडीओ प्रियांक कानूंगो यांनी पुन्हा शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हिजाब परिधान केलेली मॉडेल गृहप्रकल्पाची माहिती देताना दिसते. “एखाद्याला समाजात आपली मूल्य, परंपरांशी तडजोड करावी लागत असेल तर ते योग्य आहे का? आमच्या गृहप्रकल्पात समान विचारांचे लोक राहतात. हलाल वातावरणात तुमची मुले वाढतील. वृद्धांना इथे आदर आणि प्रेम मिळेल.”

जाहिरातीत पुढे म्हटले की, इथे प्रार्थनेसाठी विशिष्ट जागा असून सामाजिक उपक्रमांसाठीही विशेष सोय केलेली आहे.

कानूंगो यांनी ही जाहिरात पुन्हा शेअर करत महाराष्ट्र सरकारला याबद्दल नोटीस पाठवल्याचे सांगितले.

राजकारणातून उलटल्या प्रतिक्रिया

सदर जाहिरात व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी हा प्रकल्प गजवा-ए-हिंदचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. अशा गृहप्रकल्पांना मुंबई किंवा महाराष्ट्रात कुठेही स्थान नाहीस संविधानाच्या धर्मनिरपेक्ष रचनेला सदर प्रकल्प आव्हान देत आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी विकासकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शिवसेनेचे (शिंदे) प्रवक्ते कृष्णा हेगडे यांनी प्रकल्पाच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला. तसेच ही जाहिरात मागे घेण्याची मागणी केली. अशा धार्मिक मार्केटिंगमुळे समानतेच्या संवैधानिक तत्त्वांचे उल्लंघन होत आहे का? याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.