मुंबई : करोना संसर्गामुळे लागू र्निबध शिथिल होताच पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी पदपथ, रस्त्यांवरच पथाऱ्या पसरुन पादचाऱ्यांची वाट अडवण्यास सुरुवात केली आहे. तर सार्वजनिक वाहनतळ सुविधा उपलब्ध करण्यात पालिका सपशेल अपयशी ठरल्याने अनेक भागात रस्त्याच्या दुतर्फा अस्ताव्यस्त वाहने उभी करण्यात येत आहेत. त्याचा फटका पादचारी आणि वाहतुकीला बसत आहे. शिवडीमधील टोकरशी शिवराज मार्ग (टी. जे. रोड) हा त्यापैकीच एक. या भागातील रहिवाशांनी आपली व्यथा मांडण्यासाठी अनेक वेळा पालिका कार्यालय आणि स्थानिक पोलीस चौकीचे उंबरठे झिजवले. परंतु कारवाईच्या नावाने नन्नाचा पाढा वाचला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरुन केईएम रुग्णालयापुढे काही अंतरावर शिवडी परिसर सुरू होतो. या परिसरातील रहिवाशांच्या सुविधेसाठी गणपत पाटील मंडई उपलब्ध केली आहे. शिवडीतील बहुसंख्य नागरिक या मंडईत खरेदीसाठी येत असतात. मंडईच्या समोरच अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या जी. जे. रोडवर चाळी आणि टोलेजंग इमारती उभ्या आहेत. टाळेबंदीमध्ये या रस्त्यावर शुकशुकाट होता. मात्र र्निबध शिथिल होताच फेरीवाल्यांनी पदपथावरच नव्हे, तर रस्त्यावरही पथाऱ्या पसरल्या आहेत. जवळच मंडई असतानाही भाजीपाला, फळांची विक्री करण्यासाठी फेरीवाल्यांनी पथाऱ्या पसरल्या आहेत. या फेरीवाल्यांनी पदपथावरच कब्जा केला आहे. रस्त्यावर पदपथ आहे की नाही असाच तेथून जाणाऱ्याला प्रश्न पडतो. कपडे आणि अन्य वस्तूंचीही येथे विक्री केली जाते. इतकेच नव्हे तर रस्त्यावरच शेगडय़ा पेटवून कबाब शिजवून त्याची विक्रीही केली जात आहे. टी. जे. रस्त्यावर वाहने उभी करण्यास मनाई आहे. असे असतानाही रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी, टेम्पो आदी वाहने बिनदिक्कतपणे उभी करण्यात येत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harassment shivdi residents peddlers vehicles j road suffocated amy
First published on: 24-03-2022 at 03:56 IST