मुंबई : मुंबई महानगरपालिका विधी समितीचे माजी अध्यक्ष आणि २०१७ ते २०२२ या कालावधीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक हर्षद प्रकाश कारकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कारकर यांनी शुक्रवारी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला.मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे (ठाकरे) माजी नगरसेवक संजय घाडी आणि त्यांच्या पत्नी उपनेत्या व प्रवक्त्या संजना घाडी यांनी ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करीत शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केल्यानंतर १५ दिवसात दहिसरमधील माजी नगरसेवक हर्षद कारकर यांनीही ठाकरे यांची साथ सोडली.

कारकर यांनी पत्नी दिक्षा कारकरसह शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. दिक्षा या युवासेनेच्या कार्यकारिणी सदस्य असून सध्या महिला आघाडीच्या उपविभाग संघटक म्हणूनही त्या सक्रिय आहेत. मुक्तागिरी निवासस्थानी झालेल्या या पक्ष प्रवेशाच्या वेळी शिवसेना (शिंदे) सचिव राम रेपाळे, शिवसेना विभागप्रमुख स्वप्नील टेंम्बवलकर, शिवसेना महिली आघाडीच्या विभागप्रमुख मीना पाणमंद आदी उपस्थित होते. पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटातून शिंदे यांच्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. कारकर यांच्याबरोबर दहिसरमधील महिला कार्यकर्ते, शिवसैनिक, तसेच आजी-माजी शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि गटप्रमुखांनी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे यांना आमच्यासाठी वेळ नाही…

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत केलेली आघाडी हे परिसरातील सामान्य जनतेला व आम्हाला पटलेली नाही. न पटणाऱ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही संघटनेसाठी झटत राहिलो. आज आमच्या परिसरातील नागरी समस्येचे अनेक विषय आहेत. त्याबद्दल चर्चा करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही. नागरिक आमच्याकडे समस्या घेऊन येतात तेव्हा त्यांची कामे आमच्याकडून होत नाही त्याचे प्रचंड दुःख वाटते, अशी भावना केरकर यांनी समाजमाध्यमांवर व्यक्त केली.