माजी खासदार किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई : ग्रामविकासमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पैशांची अफरातफर (मनी लाँडरिंग) व बेनामी व्यवहारांद्वारे १२७ कोटी रुपयांचा गैरव्यवहार के ल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. तर मुश्रीफ यांनी सोमय्या यांच्या आरोपांचे खंडन करीत त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा १०० कोटी रुपयांचा दावा ठोकणार असल्याचे जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत सोमय्या यांनी हसन मुश्रीफ, त्यांच्या पत्नी सहेरा आणि त्यांचे पुत्र नावेद यांच्याविरुद्ध प्राप्तिकर अधिकाऱ्यांकडे तक्रार करून चौकशी करण्याची मागणी केली आहे. ते अंमलबजावणी संचालनालयाकडेही (ईडी) तक्रार करणार आहेत.

मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील बनावट (शेल)  कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत आहे. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून उत्पन्न मिळाल्याचे मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांतील व्यवहारांवरून दिसून येते. नावेद मुश्रीफ यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढविताना आपल्या उत्पन्नाबाबत दाखल केलेल्या शपथपत्रानुसार अनेक संशयास्पद कंपन्यांबरोबर त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून येते आहे. नावेद हे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे भागधारक आहेत. या साखर कारखान्याने अनेक आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँडरिंग) केल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

निवडणुकीत दाखल केलेल्या शपथपत्रात नावेद यांनी सीआरएम सिस्टीम या कंपनीकडून दोन कोटी रुपयांचे तर मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स या कंपनीकडून तीन कोटी ८५ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे दिसत आहे. या दोन्ही कंपन्या कोलकाता येथील असून यांचे संचालक असलेले सिकंदर देसाई, आलमगीर मुजावर, गोपाळ पवार हे मुश्रीफ यांचे  कार्यकर्ते आहेत. सहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे तीन लाख ७८ हजार ३४० समभाग आहेत. मुश्रीफ हे २००३ ते २०१४ या काळात कॅबिनेट मंत्री होते. या काळात घोरपडे साखर कारखान्याला शेल कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये मिळाले आहेत, असा सोमय्या यांचा आरोप आहे.

मुश्रीफ यांनी आरोप फेटाळले

हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगून त्यांच्यावर फौजदारी अब्रुनुकसानीचा १०० कोटींचा दावा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले. मुश्रीफ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांविरोधात बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. माझ्या घरावर आणि कारखान्यावर प्राप्तिकर विभागाची धाड पडली होती, त्या वेळी त्यांना काहीही सापडले नव्हते. सोमय्यांना बहुतेक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांनी काहीतरी चुकीची माहिती दिली असेल, असा टोलाही त्यांनी लगाविला

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hasan mushrif and his family embezzled rs 127 crore akp
First published on: 14-09-2021 at 00:23 IST