मुंबई : महाराष्ट्रात पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांचे प्रमाण गेल्या तीन वर्षांत लक्षणीय वाढले आहे. यंदा मुदतपूर्व पावसामुळे राज्यात मलेरिया-डेंग्यूचे संकट गडद होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. गेल्या तीन वर्षांत डेंग्यू-मलेरियाचे ६० हजारांहून अधिक रुग्ण आढळल्यचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मंबईतही यंदा मलेरिया-डेंग्यूसह साथेचे आजार मोठ्या प्रमाणात डोके वर काढणार असल्याचे पालिकेच्या डॉक्टारांचे म्हणणे आहे.

राज्यात २०२२ मध्ये मलेरियाचे १५४५१ रुग्ण आढळले तर २६ जणांचा मृत्यू झाला होता. २०२३ मध्ये १६१५८ मलेरिया रुग्ण आढळले तर १४ जण मरण पावले. २०२४ मध्ये एप्रिलपर्यंत २१०७८ रुग्णांची नोंद झाली आणि २६ जणांचा मृत्यू झाला. मुंबई व गडचिरोलीत सर्वधिक मलेरियाच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. याच काळात डेग्यूच्या रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळून आले असून २०२२ मध्ये ८५७८ रुग्ण तर २७ जणांचा मृत्यू झाला. २०२३ मध्ये १९०३४ रुग्ण आढळले तर ५५ जणांचा डेग्यूमुळे मृत्यू झाला. २०२४ मध्ये हेच प्रमाण वाढून १९३८२ रुग्णांची नोंद झाली. याचबरोबर चिकनगुन्याच्या रुग्णांच्या संख्येतही गेल्या तीन वर्षात वाढ झालेली दिसून येते. २०२२ मध्ये १०८७ तर २०२३ मध्ये १७०२ आणि २०२४ मध्ये चिकनगुन्याचे ५८५४ रुग्ण आढळून आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

यंदा मे महिन्याच्या शेवटाला, म्हणजे मुदतपूर्व मुसळधार पाऊस राज्यात कोसळला असल्यामुळे मुंबई, नागपूर, ठाणे तसेच गडचिरोली भागात साथीच्या आजारांचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रामुख्याने मुंबई-ठाणे शहरात वारेमाप होणारे बांधकाम आणि ते कमी ठरावे म्हणून सिमेंटच्या रस्त्यांची काढलेली व अर्धवट राहिलेल्या कामांमुळे जागोजागी पाणी साचून साथींचा उद्रेक होण्याची भीती डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईत आताच सर्दी-तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून करोनाचे रुग्ण कोणते व साथीच्या आजाराचे रुग्ण कोणते हे ओळखणेही अवघड झाले आहे. राज्यात आरोग्य विभागाने साथरोग आजार व डास नियंत्रणासाठी फवारणी, घनकचरा व्यवस्थापन, गप्पी मासे सोडणे आदी जनजागृती मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे तर मुंबई महापालिकेने डास निर्मूलन मोहीम अधिक आक्रमक पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर आरोग्य विभाग व मुंबई महापालिकेकडून नागरिकांनीही योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. ताप, अंगदुखी, उलट्या यांसारखी लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही आवाहन महापालिकेने केले आहे.

पावसाच्या लवकर आगमनामुळे शहरात संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड व गॅस्ट्रोएन्टेरायटिसच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे ठाण्यातील डॉ पराग देशपांडे यांंनी सांगितले.सामान्यतः जूनमध्ये डेंग्यू रुग्णांची वाढ लक्षात येत नाही. मात्र, या वर्षी मे महिन्याच्या अखेरीसच अनेक रुग्ण ताप व अंगदुखीमुळे रुग्णालयात दाखल झाले आहेत.टायफॉइड व गॅस्ट्रोएन्टेरायटिसचे रुग्ण देखील वाढले आहेत. हे आजार सहसा मे महिन्यात वाढतात, जेव्हा लोक दूषित पाणी किंवा अन्न घेतात असेही डॉ देशपांडे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डेंग्यू हा डासांद्वारे पसरणारा व्हायरल आजार आहे.याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे.याचा प्रसार एडिस एजिप्टी डासांद्वारे होतो.रुग्णांना संसर्गानंतर ५-६ दिवसांत लक्षणे दिसू लागतात.लक्षणे: उच्च ताप, कपाळदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, सांधेदुखी, स्नायुदुखी, चव व भूक मंदावणे, छाती व हातपायांवर पुरळ, मळमळ, उलटी होते. एकूणच साथीच्या आजारांची काळजी घेण्याची गरज असून कोणताही लक्षणे आढळल्यास स्वत:हून औषधोपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे कांदिवली हितवर्धक मंडळ रुग्णालयाच्या डॉक्टर नीता सिंगी यांनी सांगितले. प्रामुख्याने मधुमेह तसेच उच्च रक्तदाब असलेल्यांनी पावसाळी आजारांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. एकीकडे करोनाचे रुग्ण वाढत आहेत तर लवकर पाऊस सुरु झाल्याचे व मुंबईची पहिल्याच पावसात उडालेली दैना लक्षत घेता यंदा पावसाळी आजार मोठ्या प्रमाणात होणार हे चित्र स्पष्ट असल्याचे डॉ नीता सिंगी यांनी सांगितले.