मुंबई : आरे कारशेड, वृक्षतोडप्रकरणी उद्या सुनावणी

सुनावणीपर्यंत आरेतील एकाही झाडाला हात लावू नये असे आदेश न्यायालयाने दिले होते.

मुंबई : आरे कारशेड, वृक्षतोडप्रकरणी उद्या सुनावणी
( संग्रहित छायचित्र )

‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ची कारशेड आणि आरे वसाहतीमधील वृक्षतोडीविरोधातील याचिकांवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांनी वृक्षतोड, तसेच कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.

आरे वसाहतीमधील कामावरील बंदी उठविल्यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा, तसेच कारशेडच्या जागेत अवैध वृक्षतोड केल्याचा आरोप करीत पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.आरेमधील कारशेडसंदर्भातील सर्व याचिकांवर ५ ऑगस्ट रोजी सुनावणी झाली. यावेळी पुढील सुनावणीपर्यंत आरेतील एकाही झाडाला हात लावू नये असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याचवेळी एमएमआरसीने कारशेडमधील एकही झाड कापले नसून केवळ गवत आणि झुडपे कापल्याचे एमएमआरसीतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले होते. एमएमआरसीच्या या स्पष्टीकरणाबाबत याचिकाकर्ते, पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त करीत आक्षेप घेतला आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार आता बुधवारी पुढील सुनावणी होणार असून हे प्रकरण न्यायालयाच्या संदर्भ सूचीत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता बुधवारी न्यायालय काय आदेश देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
१५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाला बसण्याचा निवृत्त कर्मचाऱ्याचा इशारा
फोटो गॅलरी