मुंबई : मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात विधि विभागात कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना गेल्या आठवड्यात हृदयविकाराचा झटका आला. त्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तसेच, जल अभियंता खात्यातीलही एका कनिष्ठ अभियंत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये कार्डियाक दवाखाना उभारण्यात यावा, अशी मागणी महापालिका कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
महापालिकेच्या विधि विभागात सहाय्यक कायदा अधिकारी कुणाल वाघमारे यांचे कार्यालयातच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले. त्यांनतर याच विभागातील कायदा अधिकारी संगिता होनमाने यांनाही कार्यालयात हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना उपचारासाठी नजीकच्या मुंबई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
दरम्यान, पालिकेच्या ई विभागातील जल अभियंता खात्यातील कनिष्ठ अभियंता श्रेयस धर्माधिकारी यांना २५ जून रोजी दुपारी ३ च्या सुमारास कार्यालयातच हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. उपचारासाठी त्यांना नजीकच्या मसिना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू झाल्यामुळे त्यांची प्रकृती लवकरच बरी होईल, अशी आशा अन्य कर्मचाऱ्यांना होती. मात्र, उपचारादरम्यान २८ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला.
महिनाभरात घडलेल्या हृदयविकाराच्या या तिन्ही घटनांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यविषयक चिंता वाढली आहे. गेल्या पाच वर्षात सातत्याने हृदयविकाराच्या घटना घडत असून रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात नेईपर्यंत प्राथमिक उपचार मिळणे शक्य व्हावे, तातडीने उपचार मिळावा, यासाठी पालिकेच्या विविध कार्यालयात कार्डिॲक क्लिनिकची व्यवस्था करावी, अशी मागणी म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनने केली आहे.
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करता महापालिका मुख्यालय, वरळी हब, पंतनगर, परिवहन सोसायटी, बकरी अड्डा, ना. म. जोशी मार्ग आदी कार्यालयामध्ये तातडीने कार्डिॲक क्लिनिकची आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करावी, अशीही मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
महापालिकेच्या कोणत्याही कार्यालयात आपत्कालीन आरोग्य सेवा उपलब्ध नाही. केवळ किरकोळ आजारांवर उपचार करण्यात येतात. मात्र, आता कार्डियाक दवाखाना उभारण्याबाबत महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासमवेत चर्चा झाल्याची माहिती म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष रमेश भुतेकर यांनी दिली.