मुंबई / ठाणे : तापलेल्या वातावरणामुळे सोमवारी मुंबई आणि ठाणेकरांना काहिलीचा अनुभव आला. गेल्या काही दिवसांपासून ३२-३३ अंशांच्या आसपास असलेले मुंबई व उपनगरांचे तापमान सोमवारी चार अंशांनी वाढले. ठाणे जिल्ह्यासाठीही हा यंदाचा सर्वांत उष्ण दिवस ठरला. जिल्ह्याचे सरासरी तापमान ४१ अंशांवर गेले.

मुंबई शहर, उपनगरांमध्ये सोमवारी दुपारी सूर्य आग ओकत असल्याचा अनुभव आला. सकाळपासूनच तीव्र झळा जाणवत होत्या. त्यातच आर्द्रतेचे प्रमाणही अधिक असल्यामुळे मुंबईकर घामाघूम झाले. रेल्वेतील प्रवास असह्य ठरणारा होता. डबे व स्थानकांवरील पंखे पुरेसे नव्हते. फलाट तसेच बस थांब्यांवरील छताचा अभाव एरवी फारसा जाणवणारा नसला तरी सोमवारी जाचक ठरला. त्यामुळे बस थांब्यांवरील गर्दी सकाळपासूनच आटू लागली होती. उन्हाच्या झळांपासून बचावासाठी अनेकांनी वातानुकुलित लोकलची वाट पाहणे पसंत केले. फळांचा रस, सरबते, उसाचा रस, बर्फाचे गोळे विकणाऱ्या गाड्यांवर गर्दी दिसत होती. स्थानकांवर उतरल्यावर मोठ्या, गर्दीच्या स्थानकांबाहेर टोप्या, मोठे रुमाल, स्कार्फ विकणाऱ्या फेरीवाल्यांकडे प्रवाशांची पावले वळत होती. एरवी दुपारी मिळणाऱ्या सुट्टीत बाहेर फेरफटका मारणाऱ्या मुंबईकरांनी कार्यालयातच बसणे पसंत केले. उन्हाची काहिली सहन होत नसल्याने चक्कर येण्याच्या, पित्ताचा त्रास होण्याच्या तक्रारी दिसून येत आहे.

हेही वाचा >>> प्रकाश प्रदूषक रोषणाई हटविण्यास सुरुवात; उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर महापालिकेकडून कारवाई

दुसरीकडे, ठाणे जिल्ह्यात सकाळपासूनच उन्हाच्या झळा बसत होत्या. दुपारनंतर रस्त्यावर शुकशुकाट होता. सायंकाळी पाच वाजेपर्यंत चटके जाणवत होते. दुपारी दोन ते तीनच्या सुमारास जिल्ह्यात सर्वाधिक तापमान असल्याची नोंद खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी केली आहे. दरम्यान, मंगळवारीही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

काय काळजी घ्याल ?

– पाणी भरपूर प्या

– चहा, कॉफीचे सेवन टाळा

– नारळपाणी, लिंबू सरबत प्या

– पचायला हलके पदार्थ खा

– दुपारी अनावश्यक बाहेर जाणे टाळा

– छत्री, टोपी, स्कार्फचा वापर करा

लोकलमध्ये झुरळांचा उपद्रव

लोकल रेल्वेच्या डब्यांमध्ये झुरळे दिसणे नवे नसले तरी सोमवारी वाढलेल्या उष्णतेमुळे गाड्यांच्या डब्यांमध्ये लपलेल्या झुरळांच्या फौजाच डब्यांमध्ये इतस्तत फिरत होत्या. गारव्यासाठी झुरळे प्रवाशांच्या अंगावर, सामानावर चढत होती. त्यामुळे लोकलच्या प्रवाशांना झुरळांचा उपद्रव सहन करावा लागला.