मुंबई : गेले जवळपास १५ दिवस पावसाच्या प्रतीक्षेत गेल्यानंतर मागील दोन दिवसांपासून दमदार सरींनी मुंबईत हजेरी लावली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार बुधवारी पहाटेपासून शहर आणि उपनगरांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे सखल भागात पाणी साचले होते. दरम्यान, मुंबईत गुरुवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबई आणि उपनगरांतील अनेक भागात मंगळवार मध्यरात्रीपासूनच संततधार सुरू होती. बुधवारीही पावसाने उसंत घेतली नाही. बुधवारी सकाळी पावसाचा जोर वाढला होता. दुपारी काही काळ मंदावलेला पाऊस सायंकाळी पुन्हा सुरू झाला. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली होती. दादर, वरळी, प्रभादेवी, भायखळा, नरिमन पॉईंट, तसेच नवी मुंबईत बेलापूर, खारघर आणि पनवेल परिसरातही बुधवारी मुसळधार पाऊस होता. बुधवारी पहाटेपासून शहर आणि उपनगरांत पावसाने जोर धरला. दक्षिण मुंबईसह दादर, वरळी, वांद्रे, घाटकोपर, अंधेरी, पवई, कुर्ला आणि चेंबूर आदी परिसरात दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत होता. मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत २४.६ मिमी तर, सांताक्रूझ येथे ४२ मिमी पावसाची नोंद झाली.

गुरुवारी अतिमुसळधार

सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे मुंबईतही पावसाचा जोर वाढलेला आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघर भागात गुरुवारी पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाने गुरुवारी या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

आतापर्यंत झालेला पाऊस

मुंबईत जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने ओढ दिली. त्यानंतर मागील दोन दिवस पाऊस पडत आहे. साधारण जुलै महिन्यात कुलाबा येथे ७७४.१ मिमी, तर सांताक्रूझ येथे ८५५.७ मिमी पाऊस अपेक्षित असतो. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात १ ते २३ जुलैपर्यंत २८०.८ मिमी, तर सांताक्रूझ येथे ५९१.७ मिमी पाऊस नोंदला गेला आहे. मागील दोन दिवस सांताक्रूझ येथे सलग १०० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे सांताक्रूझ येथील पावसात भर पडली आहे.

सरासरी गाठण्यासाठी इतक्या पावसाची गरज

जुलै महिन्यात दोन्ही केंद्रावर मिळून १५८९.८ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा १ ते २३ जुलैपर्यंत दोन्ही केंद्रावर मिळून ८७२.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्याची सरासरी गाठण्यासाठी अजून ७१७.३ मिमी पावसाची आवश्यकता आहे. जून महिन्यातही शेवटच्या दोन – तीन दिवसांत पडलेल्या पावसामुळे सरासरी गाठता आली.

गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक

यंदाच्या तुलनेत गतवर्षी दोन्ही केंद्रांवर सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात जुलै २०२४ मध्ये १४०१.८ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात १७०२.८ मिमी पावसाची नोंद झाली होती.

मे महिन्यात सर्वाधिक पाऊस

यंदा मे महिन्यातच मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली होती. १ ते ३१ मे या कालावधीत ८८१.६ मिमी पावसाची नोंद झाली. यंदा हवामानातील बदलांमुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये मे महिन्यात नेहमीपेक्षा जास्त पडलेला वळवाचा पाऊस आणि त्यानंतर लवकरच दाखल झालेला मोसमी पाऊस यामुळे संपूर्ण मे महिन्यात ८८१.६ मिमी पावसाची नोंद झाली. मेमध्ये हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ५०३.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ३७८.४ मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी १९१८ मध्ये १ ते ३१ मेदरम्यान २७९.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर तब्बल १०७ वर्षांनी यंदा मे महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.