मुंबई : भारतीय हवामान खात्याने मंगळवारी मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून मुंबईतील ठिकठिणच्या रस्त्यांवर पाणी साचू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईत तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारीही कायम आहे. हवामान विभागाने मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुसळधार पावसासह अधूनमधून ४५ ते ५५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. अनेक भाग जलमय झाले असून त्याचा फटका वाहतुकीलाही बसला आहे. गोल देऊळ, गुलालवाडी, वडाळा, शिवडी, नबाब टॅन्क , नागपाडा ,मराठा मंदिर, दादर टीटी, परळ, भायखळा, बावला कंपाऊंड, भोईवाडा, वडाळा स्टेशन चार रस्ता, हिंदमाता जंक्शन, माटुंगा ,गांधी मार्केट या भागात सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे दीड ते दोन फुटापर्यंत पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने चालू आहे. या मुसळधारांमध्ये आज नोकरदारांची गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने सुटी जाहीर केली आहे.
तसेच, मुंबई महानगरातील सर्व खासगी कार्यालये, आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामकाजाच्या स्वरूपानुसार घरून कामकाज (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या आणि अनावश्यक प्रवास टाळण्याच्या तातडीने सूचना द्याव्यात, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
आज भरती, ओहोटी कधी ?
भरती – सकाळी ९:१६ वाजता – ३.७५ मीटर
ओहोटी – दुपारी ३:१६ वाजता – २.२२ मीटर
भरती – रात्री ८:५३ वाजता – ३.१४ मीटर
ओहोटी – मध्यरात्रीनंतर ०३:११ वाजता (उद्या, २० ऑगस्ट २०२५) – १.०५