मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांत सोमवारी मध्यरात्रीपासून कोसळलेल्या संततधार पावसामुळे सखलभाग जलमय झाले. पावसाच्या रौद्ररूपामुळे अनेकांना ‘२६ जुलै’चे स्मरण झाले. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघरमध्ये बुधवारी दिवसभर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईत दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. अनेकजण कार्यालयात पोहोचल्यानंतर सुट्टी जाहीर केल्यामुळे नंतर साचलेल्या पाण्यातून घर गाठावे लागले. रस्ते तसेच रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेकजण रेल्वे स्थानकांवर अडकले होते. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती.
मुंबईबरोबरच ठाणे नवी मुंबईतही पावसाचा दिवसभर पाऊस पडत होता. अंधेरी, घाटकोपर, विक्रोळी, दादर, परळ, वरळी, वांद्रे या भागात पावसाचा जोर अधिक होता. गेल्या २४ तासांत अनेक ठिकाणी १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. दिवसभर पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर मुंबईसाठी दुपारी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला होता. या कालावधीत अनेक भागात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सायंकाळी देखील पावसाचा जोर कायम होता. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत ६३ मिमी तर सांताक्रूझ केंद्रात १६३.४ मिमी पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर सांताक्रूझ येथे गेल्या २४ तासांत म्हणजेच सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३० या कालावधीत २३८.२ मिमी पाऊस नोंदला गेला. या चार दिवसांत झालेल्या पावसामुळे ऑगस्टची सरासरी गाठता आली आहे.
ठाण्यात मंगळवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत ११० मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यात बुधवारी देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
विक्रोळी येथे सर्वाधिक
गेल्या २४ तासांत मुंबईत अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, विक्रोळी येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली. तेथे सोमवारी सकाळी ८.३० ते मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंत २५५.५ मिमी पावसाची नोंद झाली. याचबरोबर सांताक्रूझ येथे २३८.२ मिमी, भायखळा २४१ मिमी, वांद्रे २११ मिमी, जुहू २२१ मिमी, कुलाबा ११०.४ मिमी आणि महालक्ष्मी येथे ७२.५ मिमी पावसाची नोंद झाली.