मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून बाजारपेठा आणि गल्लीबोळातील दुकाने विविध साहित्यांनी सजली आहेत. मात्र मुसळधार पावसाचा फटका बाजारपेठांना बसला असून ग्राहकांची गर्दी ओसरली आहे. परिणामी दरवर्षीच्या तुलनेत गणेशोत्सवात होणारा व्यवसाय यंदा मंदावला असून दुकानदारांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
दरवर्षी मुंबईतील दादरसह लालबाग – परळ परिसरात गणेशोत्सवानिमित्तच्या खरेदीसाठी गर्दी होत असते. विशेषतः लालबागमध्ये मखर, सजावट व पूजा साहित्य, विविध प्रकारचे मसाले आणि प्रसादासाठी लागणारे लाडू, मोदक, त्याचबरोबर चिवडा घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येथे येतात. लालबागमधील दुकाने व रस्त्यांवरील स्टॉलवर ग्राहकांची झुंबड उडालेली असते. मात्र मुंबईतील मुसळधार पावसामुळे ग्राहकांची गर्दी ओसरली आहे.
सजावट व पूजा साहित्यांची दुकाने, मसाल्यांची दुकाने आणि चिवडा गल्लीत मंगळवारी शुकशुकाट होता. ही दुकानदार स्थानिक असल्यामुळे मुसळधार पावसातही ती सुरू आहेत. तर पाणी न साचल्यामुळे साहित्याचे नुकसान झालेले नाही. मात्र मुंबईतील वाहतूक व्यवस्थाच कोलमडल्यामुळे शनिवार – रविवारी सुट्टीच्या दिवसांमध्येही लालबागच्या बाजारपेठेत अपेक्षेपेक्षा ग्राहकांची संख्या कमी असल्याचे दुकानदारांनी सांगितले. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत आर्थिक उलाढाल संथ गतीने सुरू असल्याचे चित्र लालबागच्या बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.
‘गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील विविध भागातील बहुसंख्य नागरिक सजावट व पूजेचे साहित्य, विविध प्रकारचे मसाले, लाडू, मोदक व चिवडा आदी निरनिराळ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी लालबागमध्ये येतात आणि मोठ्या प्रमाणात साहित्य कोकणात घेऊन जातात. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर ग्राहकांची लगबग सुरू होते. मात्र मुसळधार पावसामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली असून बाहेरून येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे. विविध वस्तूंच्या खरेदीसाठी स्थानिक ग्राहकच येत आहेत. परिणामी गणेशोत्सव जवळ आलेला असताना गतवर्षीच्या तुलनेत यंदा व्यवसाय कमी झाला आहे. अद्याप १० टक्केच व्यवसाय झाला आहे’, असे लालबागमधील चिवडा गल्लीतील विजयलक्ष्मी चिवडा दुकानातील शैलेश शंकर काळे यांनी सांगितले.
मुसळधार पावसाचा गणेश मूर्तीकारांनाही फटका
मुंबईतील लालबाग – परळ परिसरात लहान – मोठ्या गणेशमूर्तींच्या अनेक कार्यशाळा आहेत. मात्र मुसळधार पावसामुळे गणेशमूर्ती कारखान्यात काही प्रमाणात पाणी शिरले आहे, तर काहींनी कारखाने बंद ठेवले आहेत. ‘गणेश कार्यशाळेमध्ये चिखल झाल्यामुळे गणेशमूर्ती जमिनीवर ठेऊन कापड, हिरेकाम व रंगकामासह विविध कामे करणे शक्य नाही. तसेच अलीकडेच साकारलेल्या गणेशमूर्ती ओल्या आहेत, तर मूर्तींवरील रंग लवकर सुकत नाही. यासाठी हिटर व विविध पद्धतींचा वापर करावा लागत आहे, एकंदरीत पावसामुळे गणेश कार्यशाळांमध्ये काम करणे अवघड झाले आहे, असे लालबागमधील मोरे आर्ट्सच्या सूरज मोरे यांनी सांगितले.