मुंबई उपनगर, ठाणे जिल्ह्यात मुसळधार कायम; रस्ते, सार्वजनिक ठिकाणी शुकशुकाट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाचा नियंत्रणासाठी कडक टाळेबंदीला तोंड देत असलेल्या मुंबई,  ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या संचारावर रविवारी पावसानेही निर्बंध आणले. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी मुंबई महानगर क्षेत्रातील सर्वच शहरे जलमय झाली. पावसाचा जोर दुपारनंतर ओसरला असला तरी, कोकण किनारपट्टीवर मोसमी पाऊस सक्रिय झाला असल्याने सोमवारीही या शहरांना पाऊस झोडपण्याचा अंदाज आहे.

सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसाचा जोर मुंबई शहरात रविवारी फारसा नव्हता. मात्र, पूर्व आणि पश्चिम उपनगरांत मुसळधार कायम होती. रविवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत उपनगरांत सरासरी २००.८ मिमी तर शहरात १२९.६ मिमी पावसाची नोंद झाली. चेंबूर, विक्रोळी, बोरिवली, मुलुंड, सांताक्रुझ या उपनगरांत शनिवारी रात्री २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस नोंदवण्यात आला.  रविवारी दुपारी १२.२३ च्या सुमारास समुद्राला ४.६३ मीटर उंच लाटांची भरती होती. त्यातच सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे हिंदमाता, वडाळा, माटुंगा, वांद्रे, दहिसर सबवे यासह अनेक सखल भागांत पाणी साचले होते. पावसामुळे दिवसभरात ७५ ठिकाणी वृक्षसंपदेचे नुकसान झाले.

पावसाचा सर्वाधिक जोर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर या शहरांत जाणवला. कर्जत तालुक्यातही चांगला पाऊस झाल्याने उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. भिवंडी, कल्याण, डोंबिवली या शहरांतही पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांच्या उरल्यासुरल्या हालचालींवरही निर्बंध आले.

जनजीवन विस्कळीत

ठाण्यातील तलावपाळी परिसरातील वृक्ष रविवारी सकाळी उन्मळून पडल्याने त्याखाली उभ्या तीन वाहनांचे नुकसान झाले. पाचपाखाडी येथेही झाड कोसळून दोन वाहनांची नासधुस झाली. ठाणे शहरातील माजिवाडा, जांभळी नाका, शिवाजीनगर, आनंदनगर, नौपाडय़ातील वर्षां सोसायटी परिसर, समतानगर, वंदना सिनेमागृह, कापूरबावडी या भागात पाणी साचले होते. त्यामुळे कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्यांचे हाल झाले.  ठाणे येथील खारटन रोड परिसरातील शितलामाता मंदिराजवळ सिमेंट काँक्रीटचा रस्ता रविवारी दुपारी २० फूट खचला. मात्र, वाहनांची वर्दळ नसल्याने या दुर्घटनेत कोणतेही नुकसान झाले नाही. बदलापूर पूर्व भागात रविवारी काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता.

आजचा अंदाज

पावसाची मुसळधार कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सोमवारीही कायम राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.  किनारपट्टीवर सोसाटय़ाचा वारा वाहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.  मंगळवारपासून पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rains continue in mumbai suburb thane district abn
First published on: 06-07-2020 at 00:36 IST