मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पाऊस सक्रिय झाला आहे. शहर, तसेच उपनगरांत शुक्रवारी सकाळपसून हलक्या सरी बरसल्या. मुसळधार नसला तरी पावसाची रिपरिप सुरू होती. दरम्यान, मुंबईसह ठाणे आणि पालघर भागात शनिवारपासून पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचबरोबर राज्यातील इतर काही भागातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर ओसरला होता. काही भागात अधूनमधून पाऊस पडत होता. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईत शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार आहे. या कालावधीत अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ओढ दिली आहे. मात्र शनिवारपासून पुढचे दोन – तीन दिवस मुसळधार पाऊस पडेल. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत १५ मिमी तर, सांताक्रूझ केंद्रात १७ मिमी पावसाची नोंद झाली.
मुंबईबरोबरच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकणात काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर आहे. विदर्भातही पुढचे काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, वायव्य बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर कमी दाब क्षेत्र निर्माण झाले होते. मात्र, ही प्रणाली शुक्रवारी विरली असून ३० जून किंवा १ किंवा २ जुलैला चक्रीय स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याचबरोबर सध्या राजस्थानपासून बंगालच्या उपसागरापर्यंत द्रोणीय स्थिती आहे. त्यामुळे सध्या पावसाचे प्रमाण वाढले आहे. पावसाचे सर्वाधिक प्रमाण कोकण आणि घाटमाथ्यावर आहे.