मुंबई : उपनगरांमध्ये मंगळवारी पहाटेपासून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखलभागात पाणी साचले. परिणामी, नागरिकांना तुंबलेल्या पाण्यातून पायपीट करत प्रवास करावा लागला. साकीनाका मेट्रो स्थानक, जरी मारी परिसर, गोरेगाव, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, मानखुर्द, अंधेरी भुयारी मार्ग जलमय झाले होते. महापालिकेने नालेसफाईचे केलेले दावे मंगळवारच्या पावसाने फोल ठरवले. परिणामी, पुन्हा एकदा महापालिकेला तुंबलेल्या पाण्यामुळे टीकेचा सामना करावा लागला.
पावसाळ्यात पाणी तुंबून मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने नालेसफाईची कामे हाती घेतली होती. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ८० टक्के गाळ पावसाळ्यापूर्वी, तर १० टक्के गाळ पावसाळ्यादरम्यान काढण्यात येतो. तसेच, उर्वरित १० टक्के गाळ पावसाळ्यानंतर काढण्यात येतो. तसेच, पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचा दावा महानगरपालिकेने केला असला तरीही मंगळवारी अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याने त्यावर प्रश्नचिन्ह उभे केले.
मंगळवारी पहाटेपासून कोसळत असलेल्या मुसळधारांनी साकीनाका मेट्रो स्थानक, जरी मारी परिसर, गोरेगाव, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, मानखुर्द, अंधेरी भुयारी मार्ग, पवईतील डी.पी. रोड, एल.बी.एस. मार्गावर पाणी साचल्याचे निदर्शनास आले. सकाळी कार्यालयात निघालेल्या नोकरदार वर्गाला प्रचंड त्रास सहन करत प्रवास करावा लागला. गुडघाभर पाण्यातून वाट काढताना शाळकरी विद्यार्थ्यांचेही हाल झाले. घाटकोपर येथील गौतम नगर परिसरातील झोपड्यांमध्ये पाण्याचा शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. तसेच, घरगुती सामानाचे मोठे नुकसान झाले. मानखुर्द रेल्वे स्थानक परिसरातही दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबले होते. पाणी उपसा करणारी यंत्रणा कार्यान्वित करूनही पाणी तुंबल्याने पालिकेच्या कार्यवाहीवर नागरिकांनी टीका केली.
दरम्यान, दोन्ही उपनगरात झाडे, फांद्या पडणे, घर किंवा भिंती पडणे, शॉर्टसर्किट आदी घटना घडल्या. पूर्व उपनगरात २ व पश्चिम उपनगरात २ अशा एकूण ४ ठिकाणी झाडे, फांद्या पडण्याच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्या होत्या. त्यांनतर पालिकेकडून तात्काळ घटनास्थळी मदतकार्य हाती घेण्यात आले. पूर्व उपनगरात २ ठिकणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. तर, पूर्व उपनगरातच एकूण ३ ठिकाणी घरांचा भाग, भिंत पडण्याच्या घटना घडल्या. पालिकेच्या संबंधित विभागांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य हाती घतले. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.