मुंबई : जन्माष्टमीच्या मुहूर्तावर शुक्रवारपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईतील रस्त्यांची पार दैना केली असून ठिकठिकाणच्या लहान-मोठ्या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक मंदावली असून पादचाऱ्यांना खड्डे चुकवून मार्गक्रमण करावे लागत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोडांवर रस्त्यांची चाळण झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. नागरिकांचा रोष ओढवू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने खड्डे बुजविण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.

दरवर्षी मुंबईमध्ये दहीकाल्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवाच्या निमित्ताने मुंबईमधील समस्त गोविंदा पथके महिनाभर आधी थर रचण्याचा सरावी करीत होती. मात्र जन्माष्टमीच्या दिवशी शुक्रवारी पावसाने जोर धरला आणि दहीकाल्याच्या दिवशी पावसाने रौद्र रुप धारण केले. त्यानंतर बुधवारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. मुंबईला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे सोमवारी दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी देण्यात आली. त्याचबरोबर मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. शुक्रवारी सुरू झालेल्या पावसाने पुढील चार दिवस थैमान घातले. ठिकठिकाणचे सखलभाग पाण्याखाली गेले. पूर्व उपनगरांतील काही रस्ते अनेक तास रस्त्यांखालीच होते.

जलमय झालेले रस्त्यांवरील पाणी ओसरले, मात्र पावसाचा मारा आणि बराच वेळ साचलेले पाणी यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यांवरून अत्यंत संथगतीने वाहने पुढे सरकत आहेत. दुचाकीस्वारांना खड्डेमय रस्त्यांवरून पुढे जाताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. केवळ रस्तेच नव्हे तर पदपथांवरही खड्डे पडले आहेत. काही ठिकाणच्या पदपथांवर बसविलेले पेव्हर ब्लॉक डळमळीत झाले आहेत. त्यामुले पादचाऱ्यांना पदपथांवरून चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महिला, वृद्ध पादचाऱ्यांना खड्डेमय रस्त्यांचा फटका बसत आहे.

मुंबई शहरातून पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये जाणाऱ्या द्रुतगती महामार्गांवरही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे द्रुतगती महामार्गांवरून शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. केवळ रस्तेच नव्हे तर मुंबईतील काही उड्डाणपुलांवरही खड्डे पडले असून एकूणच मुंबईतील वाहतुकीचा वेग मंदावू लागला आहे. परिणामी, ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद््भवू लागली आहे. त्याचा सर्वात मोठा फटका वाहनचालकांना बसू लागला आहे. तसेच खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसानही होत आहे. काशीमिरा उड्डाणपूल, वांद्रे बस आगार परिसर, मार्वे रोड, चारकोप नाका, जेव्हीएलआर, परळ रेल्वे स्थानकालगतचा परिसर, घाटकोपर – मानखुर्द लिंक रोड, कुर्ला, शिवडी रेल्वे स्थानकालगतच्या रस्त्यासह अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

येत्या २७ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या गणेशमूर्ती वाजतगाजत मंडपस्थळी नेण्यास यापूर्वीच सुरूवात केली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी, तसेच छोट्या मंडळांच्या गणेशमूर्ती वाजतगाजत मंडपस्थळी आणण्यात येते. या आगमन मिरवणुकांमध्ये खड्ड्यांचे विघ्न उभे ठाकले आहे.

पालिकेची धावपळ

रस्त्यांची झालेली चाळण आणि ऐन तोंडावर आलेला गणेशोत्सव लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने खड्डे बुजविण्याठी सात दिवसांची विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवून रस्ते गुळगुळीत करण्याचा संकल्प सोडला आहे. एकूणच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेची धावपळ उडाली आहे.

बुधवारी ४४५ तक्रारी प्राप्त

रस्त्यांवर आढळणारे खड्डे तसेच दुरूस्तीयोग्य रस्त्यांसाठी महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ‘पॉटहोल क्विकफिक्स’ हे ॲप विकसित केले आहे. आतापर्यंत ‘पॉटहोल क्विकफिक्स’ ॲपवर खड्ड्यांविषयी एकूण १० हजार ८०६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ९ हजार २१२ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तर, उर्वरित तक्रारींचे निवारण करण्याची कार्यवाही सुरू आहे. विविध ठिकाणच्या रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत चालू महिन्यात महापालिकेकडे ३ हजार ३५९ तक्रारी करण्यात आल्या आहेत. मंगळवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. तसेच, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकांचा प्रवास त्रासदायक झाला. त्यांनतर पालिकेला बुधवारी एका दिवसात खड्ड्यांच्या ४४५ तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या. तसेच, खड्ड्यांव्यतिरिक्त इतर विभागांच्या ७५४ तक्रारी देखील या ॲपवर प्राप्त झाल्या आहेत.