मुंबई : गेले दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसाने मुंबई व उपनगरांत बुधवारी सायंकाळपासून जोर धरला आहे. दरम्यान, मुंबईत गुरूवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली होती. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी ७.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात १.६ मिमी पावसाची नोंद झाली. मात्र बुधवारी सायंकाळपासून पुन्हा पावसाने जोर धरला. शहरातील कुलाबा, परळ, वरळी, भायखळा परिसरात मुसळधार पाऊस कोसळत होता. तसेच गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले या भागात देखील पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान, मुंबईत पुढील दोन – तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हेही वाचा…पडणारा १२ वा उमेदवार कोण? विधान परिषदेसाठी मतांची जुळवाजुळव सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यानुसार कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईबरोबरच ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात गुरूवारी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर, विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारपासून राज्याच्या काही भागात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.