भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी यांनी सोमवारी राज्य सरकारकडून वितरित करण्यात आलेल्या भूखंडाविषयी स्पष्टीकरण देताना मी कोणताही भूखंड बळकावला नसल्याचे स्पष्ट केले. गेले काही दिवस मी भूखंड बळकावल्याची ओरड होत आहे. मात्र, मी गेल्या २० वर्षांपासून हा भूखंड मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते. यापूर्वीचे सरकारही हा भूखंड देण्यासाठी राजी होते मात्र, प्रत्येकवेळी काही ना काही अडचणी येत गेल्या. आताही सरकारकडून वितरित करण्यात आलेला हा भूखंड नियमानुसारच मिळाला आहे. त्यामध्ये कोणत्याही धोरणांची पायमल्ली झालेली नाही, असे हेमामालिनी यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी हेमामालिनी यांच्या नाटय़ विहार केंद्राला ओशिवरा येथील मोक्याच्या ठिकाणी असलेला सुमारे दोन हजार चौरस मीटर इतका भूखंड केवळ ७० हजार रुपयांत वितरित करण्यात आला होता. मात्र, हा भूखंड देताना नियमांची पायमल्ली झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मोकळी उद्याने ताब्यात घेण्याचे आदेश एकीकडे देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी उद्यानासाठी आरक्षित असलेला भूखंड हेमामालिनी यांना देण्यात आला, तसेच १९७६च्या रेडीरेकनरचा दर आकारल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.