मुंबई : राज्याची अधिकृत भाषा मराठी आहे आणि त्यामुळे दोन वकिलांना झालेल्या मारहाणीप्रकरणी नोंदवण्यात आलेला प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) मराठीऐवजी इंग्रजी भाषेत का नोंदवला, अशी विचारणा उच्च न्यायालयाने अँटॉप हिल पोलिसांना केली आहे. तसेच, कोणत्या कायदेशीर तरतुदीअंतर्गत हा गुन्हा इंग्रजी भाषेत नोंदवण्यात आला, याचे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण देण्याचे आदेश पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना दिले आहेत. पोलिसांनी आपल्याला बेकायदा ताब्यात ठेवल्याची आणि मारहाण केल्याची तक्रार वकील साधना यादव यांनी केली होती. त्याआधारे, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
यादव आणि त्यांचे सहकारी वकील हरिकेश मिश्रा यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी नासिर कुलकर्णी आणि त्या वेळी कर्तव्यावर असलेल्या इतर पोलिसांवर मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शर्मिला देखमुख यांच्या खंडपीठाने प्राथमिक माहिती अहवाल मराठीऐवजी इंग्रजी भाषेतून लिहिण्यावरून पोलिसांना धारेवर धरले.
हेही वाचा >>>उपनगरांतही बेस्टचा वातानुकूलित प्रवास घडणार; बेस्टच्या १९ दुमजली वातानुकूलित बस लवकरच प्रवाशांच्या सेवेत
या प्रकरणी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांचा विचार केल्यास यादव यांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. यादव यांनी २० मे रोजी परिमंडळ-४चे पोलीस उपायुक्त यांच्याकडे सविस्तर तक्रार केली होती.मात्र, गुन्हा नोंदवणाऱ्या अधिकाऱ्याने परिमंडळ-४चे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांचे नाव वगळण्याची तसदी घेतली नसल्यावर न्यायालयाने बोट ठेवले. तसेच, तक्रार इंग्रजी भाषेत असल्याने ती नव्याने सादर केली गेली, असेही उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात प्रामुख्याने नमूद केले. गृहखात्याच्या परिपत्रकानुसार, गुन्हा मराठी भाषेत नोंदवणे अनिवार्य आहे.त्यामुळे, या प्रकरणीही गुन्हा मराठीत नोंदवणे अपेक्षित होते; परंतु तो इंग्रजी भाषेत नोंदवण्यात आल्याकडे लक्ष वेधून न्यायालयाने त्याबाबत पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढले. या प्रकरणी गुन्हा नोंदवताना तो नोंदवणाऱ्या व्यक्तीने असंख्य चुका केल्याचे दिसून येत असल्याचेही न्यायालयाने सुनावणीच्या वेळी नमूद केले.
प्रकरण काय? याचिकेनुसार, १८ मे रोजी दुपारी २ च्या सुमारास साधना यांनी पोलीस मदतवाहिनीवर संपर्क साधला आणि त्यांच्या कार्यालयातील शौचालयाचा वापर केल्यावरून दोन व्यक्तींनी छळ केल्याची तक्रार केली. या दोन व्यक्तींविरोधात तक्रार करण्यासाठी साधना या पोलीस ठाण्यात गेल्या असता कुलकर्णी आणि त्यांच्या अन्य कर्मचाऱ्यांचा साधना यांच्याशी आधी वाद झाला. नंतर त्यांनी साधना यांना मारहाण केली व त्यांना बेकायदा पद्धतीने ताब्यात ठेवले. या प्रकरणी नोंदवलेल्या तक्रारीची दखल घेऊन गुन्हा नोंदवण्याची मागणी वारंवार केली गेली. मात्र गुन्हा दाखल केला नसल्याने याचिका केल्याचे याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटले आहे.