मुंबई : न्यायालयाला आश्वासित केल्यानंतरही वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानकाजवळील आकाशमार्गिकेच्या (स्कायवॉक) पुनर्बांधणीतील सुस्त कारभारामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याबाबत उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.

हा स्कायवॉक अपूर्ण अवस्थेत असल्याने या परिसरातील परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे. आश्वासनानंतरही स्कॉयवॉकचे काम वेळेत पूर्ण न करण्याच्या महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे परिसरातून ये-जा करणऱ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. स्कायवॉक आणि सुस्थितीतील सुरक्षित पदपथाअभावी प्रवाशांना कमालीच्या अस्वच्छ परिसरातून ये-जा करावी लागते. तसेच,जीव धोक्यात घालून चालावे लागते. ही स्थिती वेदनादायी असल्याचे ताशेरे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने महापालिकेच्या सुस्त कारभाराचा समाचार घेताना ओढले.

माजी न्यायिक अधिकारी आणि वकील के. पी. पी, नायर यांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी खंडपीठाने महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. नायर यांनी स्कायवॉकचे काम जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी करताना न्यायालयाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात महापालिका अपयशी ठरल्याचा दावा केला आहे.

या स्कायवॉकची पुनर्बांधणी १५ महिन्यांत केली जाईल, अशी हमी महापालिकेने गेल्या वर्षी न्यायालयाला दिली होती. तथापि, ही मुदत उलटल्यानंतरही स्कयवॉकचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे, नायर यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थही नायर यांनी काही छायाचित्रेही न्यायालयात सादर केली. वांद्रे पूर्व स्थानकाबाहेर केवळ एकच पदपथ असून या परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. परिणामी, वाहतूक कोंडी होऊन मोठ्या प्रमाणात अपघात होतात, न्यायालयाने नायर यांचे म्हणणे योग्य ठरवून आणि नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीची दखल घेऊन महापालिकेने या स्कायवॉकचे काम प्राधान्याने आणि जलदगतीने करायला हवे होते, अशी टिप्पणी केली.

स्कायवॉकचे काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेला मुदत मुदतवाढ हवी होती, तर तशी मागणी करायला हवी होती. तथापि, महापालिकेने यासाठी न्यायालयात अर्जच केला नाही. याशिवाय, स्कॉयवॉकचे खांब बांधण्याशिवाय काहीही काम झालेले नाही. महापालिका अधिकाऱ्यांकडून न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन/केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असल्याचेही ताशेरेही न्यायालयाने ओढले.