मुंबई : मुंबईतील जंबो करोना काळजी केंद्र घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे सहकारी सुजीत पाटकर यांना उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. याप्रकरणी दाखल मूळ गुन्ह्यात पाटकर यांना आधीच जामीन मंजूर झाल्याने उच्च न्यायालयाच्या निकालामुळे त्यांची कारागृहातून सुटका होणार आहे.
सक्त वसुली संचालनालयाने या प्रकरणी दाखल केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी पाटकर यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठाने पाटकर यांच्या याचिकेवर गेल्या आठवड्यात सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. एकलपीठाने बुधवारी याप्रकरणी निर्णय देताना पाटकर यांना एक लाख रूपयांच्या वैयक्तिक बंधपत्रावर जामीन मंजूर केला.
जामीन देण्याबाबतचा न्यायालयाचा सविस्तर आदेश नंतर उपलब्ध करण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणी दाखल मूळ प्रकरणात पाटकर यांना याआधीच जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु, त्यांना या प्रकरणात जामीन मिळाला नव्हता. आता पाटकर यांना याप्रकरणातही जामीन मिळाल्याने त्यांची कारागृहातून सुटका होणार आहे.
वरळी आणि दहिसर येथील जंबो करोना काळजी केंद्राचे कंत्राट मिळवण्याकरिता बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपाप्रकरणी पाटकर यांच्यासह अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढे हा गुन्हा मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे (ईओडब्ल्यू) वर्ग करण्यात आला. ईओडब्ल्यूकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे येथेही पाटकर यांच्याविरोधात असाच गु