तिच्या नुकसानभरपाीच्या मागणीवर सरकारसह अन्य प्रतिवाद्यांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत समाजमाध्यमावरून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे आणि विद्यार्थी निखिल भामरे या दोघांची त्यांच्याविरोधात विविध ठिकाणी दाखल गुन्हे एकत्रित करण्याची मागणी उच्च न्यायालयाने सोमवारी मान्य केली. केतकीविरोधात राज्याच्या विविध भागांत २२ गुन्हे, तर भामरेविरोधात सहा गुन्ह्यांची नोंद आहे.

केतकी आणि भामरे यांना त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवणाऱ्यांनाही प्रतिवादी करण्याचे आदेश न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी दिले होते. त्यामुळे केतकी आणि भामरे या दोघांनी त्यांची अटक बेकायदा ठरवून नुकसानभरपाईसह केलेल्या अन्य मागण्यांवरही न्यायालयाने राज्य सरकार आणि प्रकरणांतील तक्रारदारांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

पहिल्या गुन्ह्यांत जामिनावर सुटका झाल्यानंतर आणि इतर गुन्ह्यांत अटकेची कारवाई करणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केल्यानंतर केतकी आणि भामरे यांनी गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच वेळी सगळे गुन्हे एकत्रित करण्याचीही मागणी केली होती.

केतकीविरोधात कळवा पोलिसांत पहिला गुन्हा नोंदवण्यात आला होता, तर भामरेविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा नोंदवला गेला होता. न्यायालयाच्या सोमवारच्या आदेशानुसार, केतकीविरोधातील अन्य गुन्हे कळवा पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यासह, तर भामरेविरोधातील इतर गुन्हे नौपाडा पोलिसांत नोंदवलेल्या गुन्ह्याशी एकत्रित करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाची दखल घेऊन केतकी आणि भामरेविरोधातील गुन्हे एकत्रित केले. एकाच व्यक्तीवर एकाच कृतीसाठी एकापेक्षा अधिक गुन्हे नोंदवले गेले असल्यास पहिला गुन्हा मुख्य मानला जावा आणि अन्य गुन्हे त्यासोबत एकत्रित केले जावे. त्याचा भाग म्हणून पहिल्या गुन्ह्यातील साक्षीपुरावा अन्य गुन्ह्यांतही ग्राह्य धरला जाण्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. केतकी आणि भामरे यांना मे महिन्यात अटक करण्यात आली होती आणि जूनमध्ये त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.