मुंबई : दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा पुनर्विकासाच्या निविदेत एएटीके कन्स्ट्रक्शन्स या कंपनीने बाजी मारली होती. त्यानुसार निविदेचा प्रस्ताव मंजूरीसाठी राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीकडे पाठविण्यात आला होता. या निविदेस शुक्रवारी समितीने मान्यता दिली आहे. आता राज्य सरकारच्या मान्यतेनंतर निविदा अंतिम होईल आणि त्यानंतर एएटीके कन्स्ट्रक्शन्सला कार्यादेश देत प्रकल्प मार्गी लावला जाणार आहे.

कामाठीपुरा परिसरातील ३४ एकर जागेवर ७०० हून अधिक इमारती असून या इमारतींची दुरावस्था झाली असून ८ हजारांहून अधिक रहिवासी जीर्ण इमारतींमध्ये राहत आहेत. या इमारती दुरुस्तीच्या पलिकडे गेल्या आहेत. त्यामुळे येथील इमारतींचा पुनर्विकास करणे आवश्यक झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कामाठीपुराच्या पुनर्विकासाची जबाबदारी म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाकडे दिली. त्यानुसार मंडळाने आराखडा तयार करत प्रकल्पास राज्य सरकारची मान्यता घेत अखेर काही महिन्यांपूर्वी कन्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेंट एजन्सी (सी अँड डी) प्रारुपानुसार अर्थात खासगी विकासकाची नियुक्ती करत पुनर्विकास मार्गी लावण्याकरिता निविदा मागविल्या होत्या.

या निविदेस काही कारणाने अनेकदा मुदतवाढ देण्यात आल्याने पुनर्विकास लांबणीवर पडला होता. पण अखेर निविदेस दोन कंपन्यांचा प्रतिसाद मिळाला.

मेसर्स जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड आणि एएटीके कन्स्ट्रक्शन्स या कंपन्यांनी निविदा दाखल केल्या. या निविदांची छाननी करत दुरुस्ती मंडळाने काही दिवसांपूर्वी आर्थिक निविदा खुल्या केल्या आहेत. त्यानुसार यात एएटीके कन्स्ट्रक्शन्सने बाजी मारली. त्यानंतर दुरुस्ती मंडळाने निविदेचा प्रस्ताव राज्य सरकारच्या मान्यतेसाठी उच्चाधिकार समितीकडे पाठविण्यात आला होता.

उच्चाधिकार समितीची बैठक शुक्रवारी झाली त्या ,बैठकीत एएटीके कन्स्ट्रक्शन्सच्या निविदेस मान्यता देण्यात आल्याची माहिती दुरुस्ती मंडळातील वरिष्ठ अधिकार्याने दिली. तर आता राज्य सरकारच्या मान्यतेनंतर निविदा अंतिम होईल आणि त्यानंतर या कंपनीला कार्यादेश देण्यात येईल असेही अधिकार्याने सांगितले. निविदा अंतिम होणार असल्याने आता लवकरच कामाठीपुरा परिसराच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार असल्याने ही रहिवाशांसाठी आनंदाची बाब मानली जात आहे.