मुंबई : ‘हिंदू रोजगार डॉट कॉम’ नावाच्या एका संस्थेने मुंबईतील मतदारांकडून ‘मोदी मित्र अहवाल’ भरून घेण्यास सुरुवात केली आहे. मतदारांची माहिती जमविणे, त्यांना मतदानकेंद्रांबाबत माहिती देणे याबरोबरच मतदानाला जाण्याची व्यवस्था करण्याची कामे या माध्यमातून केली जात आहेत. भाजपच्या मतदारारांची काळजी घेणे किंवा मतदान वाढाविणे हा यामागचा उद्देश स्पष्ट असला, तरी हा पक्षाचा अधिकृत कार्यक्रम नसल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा >>> जाहीरनाम्यांची प्रतीक्षाच; पहिला टप्पा होऊनही शिवसेना व राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून जाहीरनामे नाहीत
‘लोढा फाऊंडेशन’शी संलग्न असलेली ‘हिंदू रोजगार डॉट कॉम’ आणि भाजपच्या काही शुभचिंतकांनी दक्षिण मुंबईसह शहरातील अन्य भागांत ‘मोदी मित्र’ नियुक्त केले आहेत. त्यांच्यामार्फत घरोघरी जाऊन मतदारांची माहिती जमा केली जात आहे. मतदार कोणत्या विभागात राहतो, कुटुंब प्रमुख कोण आणि कुटुंबातील अन्य सदस्यांची नावे, त्यांचे मोबाइल क्रमांक व अन्य माहितीची नोंद असलेला एक अर्ज भरून घेण्यात येत आहे. घरी भेट दिल्यावर मतदारांचा प्रतिसाद कसा होता, कोणता अनुभव आला असे तपशीलही अहवालात नोंदवायचे आहेत. मतदारांपर्यंत पोचण्यासाठी आणि जनसंपर्कासाठी या ‘मोदी मित्रां’ना प्रचार साहित्यही दिले जात असून त्याची माहितीही या अर्जात आहे. मतदाराचे निवडणूक केंद्र कुठे आहे? त्याला स्लीप देण्यात आली आहे का? निवडणूक ओळखपत्र क्रमांक काय आहे? मतदानाच्या दिवशी केंद्रापर्यंत नेण्याची कोणती व्यवस्था आहे, अशी माहिती या अहवालात भरली जात आहे. ‘मोदी मित्रां’ची मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी भेटही घडविण्यात येणार असून त्याबाबतही अहवाल नमुन्यामध्ये नोंद आहे. भाजपला अनुकूल मतदारांचा अंदाज या सर्वेक्षणातून बांधण्यात येत असून त्यांनी मतदानासाठी यावे, या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आहे. लोढा हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रचारप्रमुख असून त्यांच्या मदतीसाठी कार्यरत संस्थांनी ‘मोदी मित्रां’द्वारे घरोघरी जाऊन मतदार जनसंपर्काचा उपक्रम सुरू केल्याचे सांगितले जात आहे.
पक्षाचा अधिकृत कार्यक्रम नाही
संस्थेच्या काही पदाधिकाऱ्यांनी उत्साहाच्या भरात निवडणूक प्रचारासाठी हा कार्यक्रम सुरू केला. मात्र हा भाजपचा अधिकृत कार्यक्रम नसल्याचे लोढा यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. भाजपच्या एका प्रदेश पदाधिकाऱ्यांनेही नाव न छापण्याच्या अटीवर हा पक्षाचा उपक्रम किंवा निवडणूक कार्यक्रम नसल्याचे नमूद केले. एखाद्या नेत्याने, पदाधिकाऱ्याने स्वत:च्या पातळीवर उपक्रम सुरू केला असेल. भाजपने निवडणूक केंद्र (बूथ) निहाय किमान दहा कार्यकर्ते नियुक्त केले असून त्यांच्यामार्फत व्यापक जनसंपर्क मोहीम सुरू असल्याचे या पदाधिकाऱ्याने सांगितले.