मुंबई : एचआयव्ही रुग्णांच्या संख्येत मागील पाच वर्षांत सातत्याने घट होत आहे. २०१९-२० च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये एचआयव्ही रुग्णांच्या संख्येत ०.२ टक्क्यांनी घट झाली आहे. रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी नव्याने सापडणाऱ्या एचआयव्ही बाधितांमध्ये तरुणांचे प्रमाण ७५ टक्के इतके आहे. यामध्येही एचआयव्हीबाधित महिलांचे प्रमाण ३१ टक्के इतके आहे. ही बाब चिंताजनक असली तरी नव्याने सापडणाऱ्या रुग्णांवर एआरटी केंद्रामध्ये योग्य उपचार करण्याच्या संख्येतही ४.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मुंबईत २०३० पर्यंत एचआयव्हीला पूर्णपणे प्रतिबंध करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याबरोबरच अधिकाधिक तपासण्या करण्यावर भर देण्यात येत आहे. मागील पाच वर्षांमध्ये मुंबईमध्ये तब्बल २९ लाख १६ हजार ७४ नागरिकांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली. त्यातून १६ हजार ७९४ बाधित रुग्ण सापडले.

हेही वाचा…घाटकोपर फलक दुर्घटना भावेश भिंडेची दोषमुक्ततेची मागणी

मुंबईमध्ये दरवर्षी सरासरी तीन हजार नवे एचआयव्ही बाधित रुग्ण सापडत आहेत. नव्याने सापडणाऱ्या रुग्णांमध्ये १५ ते ४९ वयोगटातील रुग्णांचे प्रमाण ७५ टक्के इतके असून, यामध्ये महिलांचे प्रमाण ३१ टक्के इतके आहे. तसेच या नव्याने सापडणाऱ्या बाधितांमध्ये ९५ टक्के नागरिकांना असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे एचआयव्हीची लागण होत असल्याचे तपासणीमध्ये आढळून आल्याचे मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीचे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजय कुमार करंजकर यांनी सांगितले.

पाच वर्षांत रुग्णांमध्ये घट

मुंबईमध्ये २०१९-२० मध्ये ६ लाख ९४ हजार ८२४ नागरिकांच्या एचआयव्ही चाचण्या करण्यात आल्या. त्यातून ४ हजार ६१७ नवे रग्ण सापडले. तर २०२३-२४ मध्ये ७ लाख २९ हजार ३०९ इतक्या नागरिकांच्या एचआयव्ही चाचण्या करण्यात आल्या. त्यातून ३ हजार ३८३ रग्ण सापडले. यावरून मागील पाच वर्षांत मुंबईतील एचआयव्ही बाधित रुग्णांच्या संख्येत ०.२ टक्क्यांनी घट झाली.

हेही वाचा…बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण अटकेतील २६ आरोपींवर मोक्का

४० हजार रुग्णांवर उपचार सुरू

नव्याने सापडणाऱ्या रुग्णांना एआरटी केंद्रापर्यंत आणण्याच्या संख्येत मागील पाच वर्षांत ४.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी ४० हजार ६५८ एचआयव्हीबाधितांवर एआरटी केंद्रावर उपचार करण्यात येत आहेत.

मुंबई एड्सचा संसर्ग रोखण्याच्या उद्दिष्टांजवळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्र सरकारने २०३० पर्यंत एड्सचा संसर्ग पूर्णपणे रोखण्यासाठी ठेवलेल्या उद्दिष्ट्यांच्या जवळ मुंबई पोहोचली आहे. दरम्यान, लवकरच या उद्दिष्टांची पूर्तता होण्याची शक्यता आहे. सरकारने ९५-९५-९५ टक्के उपचारांचे लक्ष्य गाठण्याचे ध्येय ठेवले असून, मुंबईने आतापर्यंत ९३-९५-९८ टक्के इतके ध्येय पूर्ण केले आहे. २०३० पर्यंत एड्स पूर्णपणे रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत. त्यासाठी २०२५ पर्यंत एड्सच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी उपचारांचे ९५-९५-९५ टक्के ध्येय ठेवण्यात आले आहे. या ध्येयानुसार, पहिल्या टप्प्यात ९५ टक्के रुग्णांना एड्सची स्थिती माहिती असणे, दुसऱ्या टप्प्यात ९५ टक्के रुग्णांना त्यांच्यावर सुरू असलेले उपचार माहिती असणे, तर तिसऱ्या टप्प्यात ९५ टक्के रुग्णांकडून त्यांचा संसर्ग पूर्णपणे रोखला जाणे हे अपेक्षित आहे.