मुंबई : उच्च न्यायालय आणि राज्य सरकारने नोंदणीला परवानगी देऊनही होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करण्यास महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून (एमएमसी) टाळाटाळ करण्यात येत आहे. परिणामी, मागील महिनाभरापासून नोंदणी प्रक्रिया रखडल्याबद्दल होमिओपॅथी डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच परिषद हे इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमएच्या) दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप होमिओपॅथिक डॉक्टर कृती समितीकडून करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील सुमारे १० हजार होमिओपॅथी डॉक्टरांनी आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केला आहे. या डॉक्टरांची नोंदणी करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करणे बंधनकारक आहे. मात्र परिषदेकडून नोंदणी करण्यास विलंब केला जात असून त्यामुळे नोंदणी रखडली आहे, असा आरोप होमिओपॅथिक डॉक्टर कृती समितीकडून करण्यात आला आहे.
२०१४ मध्ये कायद्यात दुरुस्ती करून सीसीएमपी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. अलोपॅथीचे प्रशिक्षित डॉक्टरांकडून प्रशिक्षण घेऊन एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करत आहोत. मात्र तरीही नोंदणी मिळत नाही. उच्च न्यायालय आणि सरकारने निर्देश देऊनही एमएमसी प्रशासनाकडून अडथळे निर्माण केले जात असल्याचे महाराष्ट्र राज्य होमिओपॅथी डॉक्टर कृती समितीच्या सचिव डॉ. मनीषा जाधव यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्यसेवा देण्यासाठी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता. तरीही एमएमसीकडून मार्गदर्शकतत्वाच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जात आहे. ३० दिवसांत नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा पाले यांनी दिला.
उच्च न्यायालयाने अंतरिम आदेशात दिलेल्या निर्देशांनुसार मार्गदर्शक तत्वे बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.