मुंबई : गोरेगाव (प.) येथील जवाहर नगरमधील एका घरावर रविवारी सायंकाळी पिंपळाच्या झाडाची सुकलेली भलीमोठी फांदी पडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, घराच्या छताचे नुकसान झाले. विनंती केल्यानंतरही या झाडाची फांदी छाटण्यात पालिकेकडून दिरंगाई करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.

हेही वाचा >>> मुंबईत प्रथमच किमान तापमान २० अंशाखाली, सांताक्रूझमध्ये १३.७ नीचांकी तापमानाची नोंद

जवाहर नगरमधील देवकृपा इमारतीच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून सुमारे ५ – ६ मीटर घेर व ४५-५० मीटर उंच पिंपळाचे झाड आहे. सद्यस्थितीत हे झाड पूर्णपणे सुकले असून इमारतीलगतच्या चाळीतील घरावर या झाडाच्या फांद्या पसरल्या आहेत. त्यामुळे रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, १९ ऑक्टोबर रोजी चाळीतील एका घरावर झाडाची सुकलेली फांदी पडली. सुकलेल्या झाडाची छाटणी करण्यासंदर्भात रहिवाशांनी देवकृपा इमारतीकडून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन पालिका प्रशासनाकडे फांद्या छाटणीची मागणी केली. मात्र, पालिकेकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. रविवारी सायंकाळी अचानक झाडाची भलीमोठी फांदी येथील एका घरावर पडली. फांदीमुळे घराचे छत तुटले. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि दुर्घटनास्थळावरून तुटलेली फांदी हटविली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, अद्यापही झाडाची पूर्णपणे छाटणी झाली नसल्याने रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा >>> मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणः मुख्य सूत्रधाराची ओळख पटली, दुबईतील पाच कंपन्यांच्या खात्यावरही ४ कोटी रुपये जमा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिकेकडे अनेकदा झाडाच्या छाटणीसंदर्भात मागणी केली आहे. मात्र, पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. दुर्घटना घडल्यावर पालिका कर्मचारी तात्काळ आले. मात्र, मागणी केल्यानंतर तातडीने छाटणी करणे गरजेचे होते. पालिकेच्या कामातील दिरंगाईमुळे संबंधित दुर्घटना घडली, असा आरोप रहिवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, महापालिकेने संबंधित झाडाच्या छाटणीसंदर्भात पूर्वीच परवानगी दिलेली आहे. हे झाड खाजगी भूखंडावर असल्याने त्याच्या छाटणीची जबाबदारी पालिकेची नाही. पालिकेची परवानगी मिळाल्यानंतर रहिवाशांना कोणाकडूनही झाडाची छाटणी करून घेता येते. पालिकेमार्फतही ठराविक शुल्काची आकारणी करून झाडाची छाटणी करून दिली जाते. मात्र, यासंदर्भात रहिवाशांनी पालिकेशी संपर्क साधलेला नाही, असे पालिकेच्या पी – दक्षिण विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.