Spitting in Public Fine: उघड्यावर थुंकणे हा गुन्हा आहे. मुंबई महानगरपालिकेकडून ठिकठिकाणी क्लिनअप मार्शल अशा थुंकणाऱ्या लोकांकडून दंड वसूल करत असतात. पण त्यांना रितसर गणवेष आणि गळ्यात ओळख पत्र घालावे लागते. उघड्यावर थुंकण्याबद्दल २०० रुपये ते १०० रुपयांपर्यंतचा दंड आकारला जात असतो. पण एका व्यक्तीला तब्बल ४० हजारांचा दंड भरावा लागला आहे. पण हा दंड क्लिनअप मार्शल किंवा मनपाने नाही तर स्वतःला अंमलीपदार्थविरोधी पथकाचा अधिकारी म्हणवणाऱ्या एका तोतयाने वसूल केला आहे.

प्रकरण काय आहे?

५८ वर्षीय पीडित व्यक्ती वसंत एम. यांनी मंगळवारी ४० हजारांचा दंड भरला. पूर्व द्रुतगती मार्गावर एरोली पुलानजीक तंबाखू खाऊन थुंकल्यामुळे त्यांच्याकडून दंड वसूल केला गेला. वसंत थुंकल्यानंतर त्यांच्या बाजूला एक बुलेट येऊन उभी राहिली. बुलेटवरील व्यक्तीने खाकी पँट परिधान केलेली होती. त्याच्या पायात पोलीस घालतात तसे बूट होते. स्वतःला अंमलीपदार्थविरोधी पथकातील अधिकारी असल्याचे सांगून त्याने सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल तुम्हाला आता पोलीस ठाण्यात यावे लागेल असे सांगितले. तसेच वसंत यांचा मोबाइल हिसकावून घेतला, तसेच त्यांच्या दुचाकीची चावीही काढून घेतली.

यानंतर तोतया अधिकाऱ्याने वसंत यांना बळजबरीने त्याच्या बुलेटवर बसवून नवघर पोलीस ठाण्यात नेत असल्याचे सांगितले. कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या अलीकडे बुलेट थांबवून वसंत यांच्याकडून ६८ हजारांचा दंड मागितला. दंड भरण्याचा दबाव टाकत आरोपीने दोन एटीएममधून ४० हजार रुपये काढण्यास भाग पाडले. वसंत यांच्या बँक खात्यातील सर्व पैसे काढून घेतल्यानंतर आरोपीने त्यांना त्यांच्या दुचाकीजवळ पुन्हा आणून सोडले आणि त्यांची चावी आणि मोबाइल परत दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरी परतल्यानंतर वसंत यांनी घडलेला प्रसंग त्यांच्या पत्नीला सांगितला. त्यानंतर त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात याची तक्रार देण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून महामार्ग आणि एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यानंतर आरोपीची ओळख रवी पांडे असल्याचे कळले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून याआधी त्याने अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का? याचा तपास केला जात आहे.